उल्हासनगरात माजी नगरसेवकाच्या जागी आजी नगरसेवकाचे आमरण उपोषण

agaitation
agaitation

उल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग उपायुक्तचे आयडेंडी कार्ड,व्यापाऱ्यांच्या सहीचे कोरे धनादेश,अनेक विभागाच्या असंख्य फाईली असे 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरीही पालिका प्रशासन भदाणे यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी चार दिवस स्मशानभूमीच्या बाहेर आमरण उपोषण केले होते. मालवणकर यांची प्रकृती खालावल्यावर आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर त्यांच्या जागी विद्यमान पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नगरसेवक प्रमोद टाले यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचे पडसाद नागपूर अधिवेशनात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्कअधिकारी युवराज भदाणे यांची विशेष कार्य अधिकारी पदावर नियुक्ती करून त्यांच्याकडे संपूर्ण शहराचा अनधिकृत बांधकाम विरोधी पथक,शिक्षण व पाणी पुरवठा असा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता.हे असंवेधानीक पद असल्याने ते रद्द करण्याच्या तक्रारी झाल्या होत्या.आयुक्त निंबाळकर यांची बदली झाल्यावर आणि त्यांच्या जागी गणेश पाटील हे आयुक्तपदी आल्यावर तक्रारींची दखल घेऊन भदाणे यांना अतिरिक्त कार्यभारातून मुक्त केले होते.

मात्र त्याच दरम्यान भदाणे हे रजेवर गेले असताना त्यांनी त्यांच्या कॅबिनची चावी पालिकेत जमा करण्याऐवजी घरी ठेवली.ही तक्रार रिपाइं आठवले गटाचे नगरसेवक तथा जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी पालिका आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे केली होती. चावी पालिकेत जमा करण्याऐवजी घरी ठेवण म्हणजे भदाणे यांच्या कॅबिनमध्ये वादग्रस्त घबाडांचा दस्तावेज असण्याची आणि ते गायब केले जाण्याची शक्यता वर्तवून भालेराव यांनी ही कॅबिन सील करण्याची मागणी देखील केली होती. त्यानुसार मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर,सामान्य प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे  यांनी भदाणेची कॅबिन सील केली होती.

काही दिवसांनी महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,तक्रारधारक नगरसेवक भगवान भालेराव, मनोज लासी आदींच्या उपस्थितीत कॅबिन उघडण्यात आली. पंच दिलीप मालवणकर,प्रकाश तलरेजा, मुख्य सुरक्षा अधिकारी बाळू नेटके यांच्या देखरेखीखाली भदाणे यांच्या कॅबिनची झाडाझडती घेण्यात आली.त्यात भदाणे यांच्या नावाचे महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाचे आयडेंडी कार्ड, कोरे चेक, अधिकाऱ्यांचे शिक्के, अनेक विभागाच्या फाईली असे तब्बल 387 दस्तावेजांचे घबाड मिळून आले होते. याबाबत आयुक्त पाटील यांनी भदाणे यांना नोटीस बजावून मिळून आलेल्या दस्तावेजांचा खुलासा मागितला होता.

भदाणे यांनी काही दिवसांनी खुलासा आयुक्तांकडे सोपवला. मात्र सव्वा महिना झाला तरी भदाणेवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ पंच माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण केले. चार दिवसांच्या उपोषणा नंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यातआले. आता मालवणकर यांच्या जागी विद्यमान नगरसेवक प्रमोद टाले यांनी उपोषण सुरू केल्याने भदाणे प्रकरण आणखीन तापले असून त्याचे पडसाद नागपूर अधिवेशनात आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्याद्वारे उमटण्याची शक्यता आहे. उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी यांनी देखील उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्याकडे केली आहे. निर्णय लागे पर्यंत उपोषणावरून उठणार नाही असा पवित्रा प्रमोद टाले यांनी घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com