आहेरांच्या पाकिटात धनादेश! 

envelope
envelope

मुंबई - पैशांची टंचाई भासत असलेल्या मुंबईकरांच्या बॅंकांसमोरील रांगा आजही कायम होत्या; मात्र त्यात किंचितशी घट झाल्याचे जाणवले. आजपासून विवाहांचे मुहूर्त सुरू झाले. रोख नाही तर आहेर कसा द्यायचा, असा प्रश्‍न निर्माण झाला. अनेक वऱ्हाडींनी त्यावर शक्कल काढली आणि आहेराच्या पाकिटात चक्क धनादेश टाकून आपले "कर्तव्य' बजावले. सोबत "शगुणा'चे एक रुपयाचे नाणेही आवर्जून टाकले... असे गमतीदार प्रकार काही ठिकाणी विवाह समारंभांत आज पाहायला मिळाले. 

अनेकांच्या खात्यात सध्या पैसे आहेत; पण ते हातात पडेपर्यंत त्यांना मोठ्या दिव्यातून जावे लागत आहेत. जो तो मिळालेले तुटपुंजे पैसे पुरवून वापरत आहे. त्याचाच प्रत्यय विवाह समारंभात पाहायला मिळाला. शहरातील एटीएम मात्र अजूनही पूर्णपणे सुरू झाली नसल्याने खातेदारांच्या रांगा कायमच आहेत. सर्वाधिक खातेदार असलेल्या बॅंकांना अजूनही मोठ्या प्रमाणात काम करावे लागत आहे. कमी संख्येने खातेदार असलेल्या बॅंका आता निवांत झाल्या आहेत. अभ्युदय सहकारी बॅंकेच्या कुर्ला (बैलबाजार) शाखेत पहाटे 5 वाजल्यापासून खातेदारांच्या रांगा लागत आहेत. गेल्या गुरुवारपासून सुरू झालेला नित्यक्रम आजही कायम होता. अभ्युदय बॅंकेच्याच गोरेगाव (शास्त्रीनगर) शाखेत सकाळी थोडी रांग असते; परंतु दुपारनंतर फारसे कोणी खातेदार नसतात. 

नेत्यांक काळजी! 

आज खुद्द कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही सांताक्रूझमध्ये एटीएमच्या रांगेत उभे राहून लाईव्ह अनुभव घेतला. रांगेतील खातेदारांचीही त्यांनी आस्थेने विचारपूस केली व परिस्थिती जाणून घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी नोट रद्द करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ चर्चगेट रेल्वेस्थानकावर आंदोलन केले. दुसरीकडे भाजपनेते खातेदारांना खुर्च्या, छत्र्या, पाणी, नाश्‍ता आदींचे वाटप करून त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करीत होते. नव्या नोटांवर कोणीही काहीही लिहू नये, असा आदेश रिझर्व्ह बॅंकेने काढला आहे. त्याचा उल्लेख करून खातेदार एकमेकांना सावधगिरीचा इशारा देत होते. 

मतदान नसतानाही बोटावर शाई 

काळा पैसा पांढरा करून घेण्यासाठी विविध क्‍लृप्त्या योजल्या जात आहेत. फार कमी बॅंकांमध्ये जुन्या नोटा बदलून नव्या दिल्या जात आहेत. त्यातही खातेदारांनी पुन्हा पुन्हा नोटा बदलून घेऊ नयेत म्हणून अशा खातेदारांच्या बोटांना शाई लावण्याची सुरुवात आज काही बॅंकांमध्ये झाली. परळमधील बॅंक ऑफ इंडियातील शाई थोड्या वेळातच संपून गेली. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये तर शाई लावलीच जात नव्हती. 

नाण्यांच्या पुड्या वाटल्या 

नोटा संपल्याने काही बॅंकांमध्ये नागरिकांना चिल्लर नाण्यांची पुडकी वाटण्यात आली. चिल्लर का असेना, पैसे हातात पडल्याने खातेदारांना थोडा दिलासा मिळाला. एक, दोन व पाच रुपयांची शंभर नाणी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या बॅंकेतून दिल्या जात होत्या. त्यामुळे काही दिवस नक्कीच निभावून नेले जातील, अशा प्रतिक्रियाही व्यक्त होत होत्या. 

लग्नात धनादेश 

रोख रकमेच्या टंचाईमुळे विवाहप्रसंगी आहेरात धनादेश देण्याचा गमतीदार प्रकारही काही ठिकाणी दिसून आला. आज काही ठिकाणी लग्नाचे मुहूर्त होते. नव्या जोडप्याला आहेरात जुन्या नोटा देता येत नाहीत आणि एकदम दोन हजारांची नोट किंवा सुटे पैसेही द्यायचे नाहीत, अशा कात्रीत सापडलेल्या काही नातलगांनी चक्क धनादेश लिहून तेच आहेराच्या पाकिटात टाकले. सोबत एक रुपयाचे नाणेही टाकले आणि वेळ मारून नेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com