ऐरोलीत वाहतुकीचा बट्ट्याबोळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

येथील फेरीवाल्यांवर आम्ही कारवाई करणार आहोत. यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. येथील बेकायदा फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई सुरू असते.
- तुषार बाबर, ऐरोली विभाग अधिकारी

तुर्भे - ऐरोली सेक्‍टर २० पासून पटनी कंपनीपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा आयटी कंपन्या आहेत. एमआयडीसीच्या पटनी मैदानात सभा व आध्यात्मिक कार्यक्रम होतात. अशा या महत्त्वाच्या भागातील रस्त्यावर काही दिवसांपासून बेकायदा फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे येथे वाहतुकीत अडथळे तर निर्माण होतातच; शिवाय नागरिकांनाही येथून ये-जा करताना गैरसोईचा सामना करावा लागत आहे.

ऐरोलीला जोडणाऱ्या या मार्गाला खाद्यपदार्थ विक्रेते व फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. 

या मार्गावर मुंबई आणि ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. येथून दररोज हजारो वाहने धावतात. तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम सुरू केली होती. त्या वेळी रस्ते आणि पदपथांवर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवरही कारवाईचा बडगा उगारला होता. या कारवाईमुळे शहरातील पदपथ आणि रस्ते पादचाऱ्यांसाठी मोकळे झाले होते; परंतु आता या कारवाईचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे फेरीवाले पुन्हा पदपथांवर आले आहेत.

हायटेक सिटी बकाल
फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीअभावी शहरात बेकायदा फेरीवाल्यांचे पेव फुटले आहे. रस्ते, पदपथ, सार्वजनिक जागा आदींवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले. स्थानिक राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळत असल्याने या ठिकाणांनी फेरीवाल्यांच्या समस्येने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. परिणामी, माहिती व तंत्रज्ञानाच्या या शहराला बकाल रूप आले आहे. बेकायदा फेरीवाल्यांमुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी सर्वप्रथम या प्रश्नाला हात घातला होता. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात होती. यामुळे शहरातील बहुतेक रस्ते व पदपथ रिकामे झाले होते.