सादरीकरणाचा विचार करा - शरद पवार

Sharad-Pawar
Sharad-Pawar

मुंबई - मराठी नाटकांतील आशय आणि विषयात मला कमतरता दिसत नाही; मात्र सादरीकरण आणि अभिव्यक्तीचा विचार आपण किती करतो, हे महत्त्वाचे आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले. आजची बालरंगभूमी ही उद्याची प्रायोगिक आणि व्यावसायिक ठरू शकते, त्यामुळे बालरंगभूमीचा पाया भक्कम करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनास बुधवारपासून मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्य मंदिराच्या प्रियदर्शनी क्रीडा संकुलात सुरवात झाली. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन झाले, त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही या वेळी उपस्थित होते. संमेलनाचे मावळते अध्यक्ष जयंत सावरकर यांनी संमेलनाध्यक्षाची पगडी देत अध्यक्षपदाची सूत्रे अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्याकडे सुपूर्द केली.

पवार म्हणाले, की नाटक ही महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे. अनेक रंगकर्मींनी रंगभूमीसाठी आयुष्य झिजवले आहे. गेल्या दोन पिढ्यांत ज्यांनी नाट्यक्षेत्राला योगदान दिले, ते पाहण्याची संधी मला मिळाली. इंग्लंडमधील नाटके आणि तेथील व्यवस्था पाहण्याची संधीही मिळाली. त्या तुलनेत आशय आणि विषयात मला कमतरता दिसत नाही; मात्र सादरीकरण आणि अभिव्यक्तीचा विचार आपण किती करतो, हे पाहणे गरजेचे आहे. आर्थिक प्रश्‍न असला तरी सरकारी मदतीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. चांगल्या नाट्यकृतींना प्रतिसाद दिल्याशिवाय प्रेक्षक राहणार नाहीत.

मराठी रंगभूमीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. रंगभूमी टिकवण्याची आणि तिला भांडवल पुरवण्याची जबाबदारी केवळ प्रेक्षक किंवा सरकारची नाही, उद्योगपतींनीही ती सामाजिक जाणीव ठेवून त्याला मदत करायला हवी, असे मत नव्या जाणिवेचे नाटककार सतीश आळेकर यांनी संमेलनाचे उद्‌घाटन करताना केले. नाटकाने करमणूक करावीच; पण विचारही द्यावा, असे सांगतानाच त्यातील व्यवसायही विसरता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वसाधारण वारकऱ्याला सर्वप्रथम विठ्ठलपूजेचा मान मिळावा, तशी माझी भावना हा नाट्यसंमेलन अध्यक्षाचा मान स्वीकारताना आहे. माझे आई- वडील नाट्यपंढरीचे वारकरी असल्याने त्यांनी सोपवलेला हा वारसा आहे, यापुढेही जपू, असे नाट्यसंमेनाध्यक्ष कीर्ती शिलेदार म्हणाल्या.

मावळते संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, कार्यवाह शरद पोंक्षे यांचीही भाषणे झाली.

भव्यता-संहिता एकत्र आणा - राज ठाकरे
मराठी नाटकांकडे तरुण पिढीला वळवायचे असल्यास भव्यता आणि संहिता एकत्र आणा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाट्यकर्मींना दिला. नाटकं खूप येत आहेत; पण चालताहेत किती, हा कळीचा प्रश्‍न असल्याचे सांगत ते म्हणाले, 'तरुण पिढीला जागतिक रंगभूमीवर चाललेल्या उत्तमोत्तम गोष्टी कळतात, पाहताही येतात. त्यामुळे ती भव्यता आणि उत्तम संहिता असल्याशिवाय तरुण पिढी मराठी नाटकांकडे वळणार नाही.''

अभिनेते प्रशांत दामले यांचा सत्कार ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले, 'साखर खाल्लेल्या माणसाचा शिव्या खाल्लेल्या माणसाच्या हस्ते सत्कार होतोय, हा दोष आयोजकांचा आहे.'' शरद पवारांबरोबर व्यासपीठ दुसऱ्यांदा शेअर करत असल्याच्या योगाचाही त्यांनी उल्लेख केला. त्यामागे भाजपचे विनोद तावडे असल्याचे सांगत "आम्ही एकत्र यावे, अशी कुणाची इच्छा आहे, हे तुम्हीच सांगा,' असा सवालही त्यांनी प्रेक्षकांना केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com