Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारात तेजी

दागिन्यांपेक्षा नाण्यांच्या खरेदीचा उत्साह; स्थिर भावामुळे दिलासा
Akshaya Tritiya 2022  buy coins rather than jewelry gold rate mumbai
Akshaya Tritiya 2022 buy coins rather than jewelry gold rate mumbaisakal

मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीया सणाला विशेष महत्त्व असल्याने नागरिक नवीन कामांची सुरुवात, अथवा सोने, वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अशा मूल्यवान वस्तूंची खरेदी करतात. मागील वर्षी कोरोनाची दुसरी लाट आल्याने या सणानिमित्त होणाऱ्या खरेदीत मोठी घट झाली होती. मात्र दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधमुक्त अक्षय्य तृतीया असल्याने नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह जाणवत असल्याचे सुवर्ण व्यावसायिक सांगत आहेत. उद्या पूजेसाठी नाण्यांची खरेदी जास्त होईल, अशीही अपेक्षा आहे.

अक्षय्यतृतीया हा सण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या देशात साजरा होतो. या दिवशी पूजेसाठी मुख्यतः सोन्याच्या नाण्यांची खरेदी होते. त्या नाण्यांची मनोभावे पूजा करून व्यवहारांना सुरुवात होते. या दिवशी देशभरात सुमारे सात ते आठ टन सोन्याच्या नाण्यांची विक्री होते. यात एक ग्रॅमपासून ते १०० ग्रॅमपर्यंतची नाणी असतात. अर्थात जास्त विक्री पाच ते १० ग्रॅमच्या नाण्यांची होते, असे पीएनजी ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ यांनी `सकाळ`ला सांगितले.

कोरोनापूर्वकाळात म्हणजे २०१९ च्या अक्षय्य तृतीयेला देशभरात १८ टन सोन्याच्या नाण्यांची खरेदी झाली होती. आताचा उत्साह पाहता हा आकडा २० टनांपर्यंत जाईल. कारण आता सोन्याचे भावही स्थिर असून ते ५० हजारांच्या खाली जात नाहीत, हे सर्वांना कळले आहे. या दिवशी चांदीच्या नाण्यांची विक्रीही सोन्यापेक्षा साधारण तिप्पट होते. रशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे चलनवाढ झाली तर डॉलरपेक्षा सोने सुरक्षित असल्याने त्यावर सर्वांचा भर आहे, असेही गाडगीळ म्हणाले.

वाहन खरेदीला मुहूर्त पावला

इंधनाच्या दरानी उच्चांक गाठल्याने इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. मात्र अक्षय्यतृतीयेचा सण आल्याने त्याचा मुहूर्त साधण्यासाठी अनेक ग्राहक वाहन खरेदी करण्याकडे वळत आहेत.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा बुकिंग आली नसली तरी त्यात मोठ्या प्रमाणात घट झाली नसल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले. तसेच ग्राहक इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे वळत असल्याचे निरीक्षण वाहन विक्रेत्यांनी नोंदवले.

1 यंदा उन्हाचा तडाखाही फार वाढत असल्याने एसी, फ्रिज, कुलर आदी वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा अधिक ओढा आहे. उन्हाळ्यात एसी तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमती वाढल्या असल्या तरी मुहूर्त साधत, या वस्तूंच्या खरेदीला ग्राहक प्राधान्य देत आहेत.

2 अधिकतर ग्राहक सुलभ हप्त्यांवर (ईएमआय) वस्तू खरेदीसाठी प्राधान्य देत आहेत. सध्या बाजारात विविध कंपनी तसेच प्रतिटनानुसार एसीच्या किमती २८ हजार ते ४० हजारापर्यंत आहेत. तर कुलरच्या किमती या ५ ते १० हजारापर्यंत आहेत. तसेच लहान, मोठ्या आकारमानानुसार फ्रीजच्या किमती १४ हजारापासून पुढे आहेत.

आंबे खरेदीत हात आखडता

मे महिना उजाडूनही आंब्यांचे दर हे आवाक्याबाहेरच आहेत. सध्या रत्नागिरी हापूस, पायरी आंबा, देवगड हापूस आदी जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती ९०० ते ११०० रुपये प्रतिडझन इतक्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीत हात आखडता घेतल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

नाण्यांमध्ये अर्थात गणपती, लक्ष्मी, सरस्वती यांच्या नाण्यांवर भर असतो. यावेळी एका बाजूला गणपती व दुसरीकडे सरस्वती अशीही नाणी आली आहेत. आम्ही पाडव्यापासून ५० हजारांवरील सोनेखरेदीवर लकी ड्रॉमार्फत वाहने, टीव्ही, लॅपटॉप अशी बक्षिसे जाहीर केली आहेत. त्याचा ड्रॉ देखील महिनाअखेरीस काढला जाईल.

- सौरभ गाडगीळ, संचालक, पीएनजी ज्वेलर्स.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com