नेरळमध्ये चार पिस्तुलांसह 18 काडतुसे जप्त; युपीतील एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

रायगड गुन्हे अन्वेषणची कारवाई ः युपीतील वृंदावन व्दिवेदी अटक

अलिबाग: रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील नेरळ येथील टॅक्सी स्टँडजवळ पिस्तुले घेऊन विक्रीला आलेल्या उत्तर प्रदेशमधील जरेलीकोठी गावच्या वृंदावन भाऊराव त्रिवेदी (60) या गुन्हेगाराला रायगड गुन्हे अन्वेषण शाखेने चार पिस्तुले, 18 जिवंत काडतुसांसह अटक केल्याने या कारवाईमुळे गुन्हेगारीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुप्त बातमीदारातर्फे मिळालेल्या माहितीनुसार रायगड गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी, सहायक निरीक्षक एस.एस. आव्हाड, महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका बुरुंगडे, भानुदास कराळे, महेश पाटील, देवा कोरम या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. 12) साडेआठच्या सुमारास नेरळ येथील टॅक्सी स्टँड येथून वृंदावन भाऊराम व्दिवेदी (रा. जरेलीकोठी, उत्तरप्रदेश) याला दोन लाख किमतीच्या चार रिल्हॉल्व्हर आणि 18 जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले.

यातील एक सिल्व्हर रंगाचे पिस्तुल ट्रिगलगार्ड, मॅग्झिन फायरिंग पिनसह, बॅरलची लांबी 9 सेमी, पिस्तुल 16 सेमी लांबीचे आहे. दुसरे पिस्तूल 50 हजार किंमतीचे देशी बनावटीचे काळ्या रंगाचे ट्रिगलगार्ड रिकामे मॅग्झिन डाव्या बाजूस सेफ्टी कॅच, हॅमर फायरिंग पिन अशा स्वरुपाचे आहे. या पिस्तुलाची लांबी 14 सेमी आहे. तिसरे पिस्तुल 50 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे 14 सेमी लांबीचे, तर चौथे पिस्तुल 50 हजार किंमतीचे देशी बनावटीचे, 13 सेमी लांबीचे असे एकूण चार पिस्तूल आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सहा जणांच्या पथकाने ही कारवाई केली. आता ही शस्रे घेऊन वृंदावन व्दिवेदी नेमके काय करणार होता याचा शोध पोलिस घेत आहेत.