एपीएमसीची सुरक्षा रामभरोसे! 

एपीएमसीची सुरक्षा रामभरोसे! 

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशीतील पाचही बाजारांच्या इमारतींचे त्या बांधल्यापासून आजतागायत फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक माहिती दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीच्या घटनेनंतर उघडकीस आली आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या मध्यभागी असलेल्या एपीएमसी मार्केटची सुरक्षा रामभरोसे असल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एपीएमसीचे नवे प्रशासक सतीश सोनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फायर ऑडिट करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

मुंबई, उपनगरे व इतर शहरांना भाजीपाला, अन्नधान्य, मसाले, फळे, कांदा-बटाट पुरवण्याच्या हेतूने नवी मुंबईत 1994 मध्ये सिडकोने वाशीत सुमारे 30 एकरवर घाऊक बाजाराच्या पाच इमारती बांधल्या. कालांतराने व्यापाराचा वाढता व्याप व पुढील 50 वर्षांचे सिडकोने नियोजन केले नसल्यामुळे मार्केट परिसरात ग्रामीण भागातून शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांचा खोळंबा होऊ लागला. वाहनांसाठी वाहनतळ नसल्याने माल खाली केल्यानंतरही वाहने तासन्‌तास गाळ्यासमोरच उभी असतात. यात धान्य, फळ, भाजीपाला, कांदा-बटाट मार्केटसह मसाला मार्केटचा समावेश आहे. यामुळे तेथे दररोज सकाळी वाहतूक कोंडी असते. मार्केट परिसरातील बाहेरच्या रस्त्यांवरही रहदारी वाढली असल्याने येथे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे आणीबाणीच्या वेळी तेथे मदत पोहोचवणे अवघड झाले आहे. याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी मसाला मार्केटमध्ये लागलेल्या आगीच्यावेळी आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमनच्या वाहनांना आला. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी प्रशासक सोनी यांच्यासोबत बैठक घेऊन मार्केटमध्ये आग विझवण्यासाठी व आग लागू नये यासाठी घ्यायच्या खबरदारीच्या सूचना केल्या. तेव्हा या मार्केटचे आजपर्यंत फायर ऑडिटच झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली. त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या वाहनचालकांसह व्यापारी, शेतकरी व ग्राहक यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे तेथे एखादी दुर्घटना घडली तर मोठी जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे. 

...तर आग टाळता आली असती 
एपीएमसी मार्केटमध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने केव्हाही आग लागू शकते. त्यामुळे योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिकेने 2013 पासून एपीएमसी प्रशासनाला दिल्या होत्या, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांनी दिली; परंतु त्याकडे वारंवार होत असलेल्या दुर्लक्षामुळे आजपर्यंत फायर ऑडिट झालेले नाही. महापालिकेने केलेल्या सूचनांचे पालन केले असते तर दोन दिवसांपूर्वी मसाला मार्केटमध्ये लागलेली आगीची घटना टाळता आली असती. 

मार्केट इमारतींच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची आहे. खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. तसेच फायर ऑडिट करण्याबाबतचेही आदेश बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 
- सतीश सोनी, प्रशासक, एपीएमसी मार्केट समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com