विमान अपहरणाची खोटी माहिती देणाऱ्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई - मुंबई, चेन्नई, हैदराबाद येथून उड्डाण करणाऱ्या विमानांचे अपहरण केले जाईल, अशी खोटी माहिती देऊन सुरक्षा यंत्रणांची झोप उडवणाऱ्या दोघांना हैदराबाद पोलिसांनी नुकतेच अटक केले. प्रेयसीला विमानाने गोवा आणि मुंबईला नेण्याकरिता एका आरोपीकडे पैसे नव्हते. अपहरणाच्या माहितीने विमानतळावर "हाय अलर्ट' जारी होऊन विमानांचे उड्डाण थांबेल, असे त्याला वाटत होते. त्यातूनच त्याने खोटी माहिती दिल्याचे उघडकीस आले आहे. अटक केलेल्या आरोपींचा ताबा घेण्यासाठी सहार पोलिसांचे पथक हैदराबादला जाणार आहे. 

मुंबई पोलिसांना गेल्या रविवारी (ता. 16) ई-मेल आला होता. त्यात एकाच वेळी मुंबई, चेन्नई, हैदराबादहून उड्डाण करणाऱ्या विमानांचे अपहरण होणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे तिन्ही विमानतळांवर "हाय अलर्ट' जारी करण्यात आला होता. हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले. त्यातील एकाच्या प्रेयसीला विमानाने मुंबई आणि गोवा असा प्रवास करायचा होता. पण, आरोपीकडे पैसे नव्हते. त्याने बनावट नावाने ई-मेल तयार केला आणि त्याद्वारे मुंबई पोलिसांना अपहरणाची माहिती देणारा मेल पाठवला. हैदराबाद पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने ही कबुली दिली. 

अपहरणाच्या माहितीप्रकरणी शुक्रवारी सहार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा ताबा घेण्याकरिता सहार पोलिसांचे पथक हैदराबादला जाणार आहे. अधिक तपासाकरिता सायबर पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.