मोखाड्यात आश्रमशाळा बांधकाम घोटाळा

Ashramshala building scam in Mokhada
Ashramshala building scam in Mokhada

मोखाडा : सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत मोखाड्यातील सुर्यमाळ येथे सुसज्ज आश्रमशाळा बांधण्याचे काम वैष्णवी इन्फ्रास्ट्रक्चर, नाशिक या कंत्राटदाराने घेतले आहे. या संकुलाचे बांधकाम  केवळ 40  टक्के झालेले असतांना, बांधकाम खात्याने कंत्राटदारास 115  टक्के रक्कम अदा करण्याची किमया केली आहे. सदरच्या बांधकामाची मुदत दोन वर्षापुर्वीच संपलेली असुन कामही निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा अहवाल आदिवासी विकास विभागाने दिला आहे. त्यामुळे संकुलाच्या बांधकामाचा घोटाळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगनमताने केल्याचे उघडकीस आले आहे. 

आदिवासी विकास विभागाने भरीव तरतूद दिल्याने सन  2013  मध्ये सुसज्ज आश्रमशाळा संकुलाच्या बांधकामांना मोखाड्यात सुर्यमाळ, पळसुंडा, गोंदे आणि हिरवे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सुरूवात झाली होती. त्यापैकी गोंदे आणि हिरवे येथील संकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, सुर्यमाळ आणि पळसुंडा येथील बांधकाम, कामाचा कालावधी संपून दोन वर्षे झाली तरी अपुर्ण अवस्थेत आहेत. सुर्यमाळ येथील संकुलाची  6  कोटी  14  लक्ष  44 हजार तर पळसुंडा येथील  6   कोटी  49   लक्ष   86  हजार इतकी अंदाजपत्रकीय रक्कम आहे. सुर्यमाळ येथील काम वैष्णवी इन्फ्रास्ट्रक्चर, नाशिक यांनी  7. 10  तर पळसुंडा येथील काम समर्थ असोसिएट, नाशिक यांनी  7. 56  टक्के अंदाजपत्रक रकमेपेक्षा वाढीव दराने निविदा प्रक्रियेतुन घेतले आहे. सदरचे काम पूर्ण करण्यासाठी सन  2013  ते   2016 असा तीन वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. अंदाजपत्रकात शाळा ईमारत तसेच मुला, मुलींच्या स्वतंत्र निवासी संकुलाचा समावेश करण्यात आला आहे.
मात्र, बांधकामाचा कालावधी संपून दोन वर्षे उलटुनही दोन्ही बांधकामे अपुर्ण अवस्थेत आहेत. सुर्यमाळ येथे केवळ शाळा ईमारतीचे बांधकाम अपुर्णावस्थेत झालेले आहे. तर एकूण संकुलाचे बांधकाम केवळ  40  टक्के झालेले असतांना, बांधकाम खात्याने कंत्राटदारास  115  टक्के रक्कम अदा करण्याची किमया केली आहे.  6  कोटी  14  लक्ष  44  हजाराच्या कामाचे अंदाजपत्रक असतांना तीन वर्षात केवळ  40   टक्के कामावर   7  कोटी  8  लक्ष  39   हजाराचे बिल वैष्णवी इन्फ्रास्ट्रक्चरला मुक्त हस्ते दिले आहेत. यामध्ये जुन  2014  मध्ये   23  लक्ष  82  हजार  930  तर मे  2016  ला  37  लक्ष  3  हजार अशी एकूण  60  लक्ष  85  हजार  930  रूपयांची बांधकाम साहित्याची घसघशीत भाववाढ ही दिली आहे. 

या आश्रमशाळा संकुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. या बाबत सुर्यमाळ ग्रामपंचायतीने  2   ऑक्टोबर  2017  च्या ग्रामसभेत ठराव घेऊन, त्याबाबत ची तक्रार आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कडे केली होती. मात्र, त्यांची कुठेच दखल घेतली गेली नाही. त्यानंतर या सदोष कामाच्या बातम्या माध्यमांनी करून हे प्रकरण चव्हाटय़ावर आणले आहे. 

त्याची दखल घेऊन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशान्वये आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी आर. ए. गुजर , आदिवासी विकास विभागाच्या बांधकाम खात्याचे उपअभियंता प्रकाश सोनाळीकर, शाखा अभियंता पवार यांनी  31  जुलैला या कामाची संयुक्त पाहणी केली. त्यावेळी त्यांना तेथे चार मजुर आर सी सी काॅलम , जमीनीवर च सिमेंट, खडी , रेती कालवून भरत असल्याचे आढळले. त्यांनी हे काम तात्काळ थांबविले , आणि तशी नोंद सुर्यमाळ आश्रमशाळेच्या शेरेबुकात नोंदविली आहे. सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असुन ते पाडावेच लागेल असे आदिवासी विकास बांधकाम खात्याचे  ऊपअभियंता प्रकाश सोनाळीकर यांनी सकाळला सांगितले आहे. 

दरम्यान, डिसेंबर  2016  मध्ये आदिवासी विकास विभागाने आपला स्वतंत्र बांधकाम व्यवस्थापन कक्ष स्थापन केला आहे. त्यानंतर झालेली व होणारी आश्रमशाळेची बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या नव्या कक्षाकडे हस्तांतर करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, त्यामध्ये तक्रारी अथवा निकृष्ट बांधकामाचा दर्जा आढळून येत असल्यास त्याची दक्षता व गुणनियंत्रण मंडळाकडून तपासणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने सुर्यमाळ आश्रमशाळेचे अर्धवट स्थितीतील बांधकाम  30   मे   2017 ला हस्तांतरित करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आम्हाला सदरच्या बांधकामाची संपूर्ण कागदपत्र मिळालेली नाहीत तसेच आमच्या कडे ते हस्तांतरच झालेले नाही. तर आजही या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याद्वारेच काम सुरू असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या बांधकाम खात्याचे उपअभियंता प्रकाश सोनाळीकर यांनी तसेच  येथे काम करत असलेल्या मजुरांनी सांगितले आहे. त्यामुळे या कामाचे आगाऊ बिल संबंधित कंत्राटदारास दिले असून त्यात बांधकाम खात्याचे शाखा अभियंता एस एस पाटील भागीदार असल्याचा स्पष्ट आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. 

उद्याच्या भागात वाचा घोटाळा कसा झाला. 
विधानसभा आणि विधान परिषदेत खोटी माहिती सादर केली. कामाच्या तपासणीचा अहवाल दडपला. कामाचे आवश्यक नोंदवह्या, लेखापरिक्षण का झाले नाही?      
             

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com