एटीएम हॅंग करणारे ताब्यात 

एटीएम हॅंग करणारे ताब्यात 

ठाणे - एटीएममध्ये मशीन हॅंग करून पैसे काढणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना गुरुवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 13 डेबिट कार्ड जप्त केली आहेत. अमिताब ऊर्फ जाहीर आलम खान (वय 28), संतोष ओमप्रकाश गिरी (38), कमलेश बिकर्माजित यादव (27), विजय पांडे (48), अलोक सिंह (30), अहमद हुसेन खान (24) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. 

एटीएममध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांचे पैसे काढले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार या प्रकरणांचा शोध ठाणे पोलिसांकडून सुरू होता. एटीएममधून पैसे काढून नागरिकांची फसवणूक करणारी एक टोळी वसईच्या नायगावमध्ये येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. या आधारे सापळा रचून या टोळीला पोलिसांनी अटक केली. हे सहा जण प्रामुख्याने वसई, विरार, काशीमिरा, मिरा रोड, नालासोपारा, ठाणे, कल्याण, मुंब्रा, कोळसेवाडी, शहापूर येथील एटीएममध्ये मशीन हॅंग करून ग्राहकांची फसवणूक करत असल्याची माहिती रणवरे यांनी दिली. 

अशी व्हायची फसवणूक  
ज्या एटीएमबाहेर सुरक्षारक्षक नसतात त्याच ठिकाणांना टोळी लक्ष्य करत. ग्राहक एटीएम केंद्रात जात असत त्या वेळी त्याच्या मागे एक जण जायचा. 

ग्राहकाच्या शेजारी जाऊन डावा हात एटीएमवर ठेवत. मशीनचे एखादे बटण नकळत दाबत. त्यामुळे ज्या वेळी पैसे काढण्यासाठी वेळ लागायचा, असे झाले की मशीन काही सेकंद हॅंग होत असे. ग्राहकाने मदत मागितली की या दरम्यान व्यक्तीचा एटीएम पासवर्ड माहिती करून घेई. हातचलाखीने त्याचे एटीएम कार्ड काढून दुसरे एटीएम कार्ड ग्राहकाच्या हातात देत असे. ग्राहकासोबत तो बाहेर येत असे. त्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या टोळीतील तिसऱ्या व्यक्तीला पासवर्ड आणि बदललेले एटीएम देत असे. दुसऱ्या क्षणालाच खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज ग्राहकाला यायचा. बऱ्याच जणांना त्यांनी अशाप्रकारे गंडा घातल्याचे चौकशीत उघड झाले आहे. 

40 लाखांना गंडा 
गुन्ह्यांतील आरोपी अमिताब खान व संतोष गिरी यांना उत्तर प्रदेशातून अटक झाली होती; मात्र त्यांना जामीन मिळाला होता. अशाप्रकारे दररोज ही टोळी दोन ते तीन जणांची फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दीड वर्षापासून ही टोळी कार्यरत आहे. त्यात तब्बल 30 ते 40 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

"अशा एटीएममधून  पैसे काढू नका' 
एटीएम केंद्रात आपल्यामागे कोणी उभे असल्यास ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक किंवा सीसी टीव्ही कॅमेरे नसतील तरीही पैसे काढू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com