462 कोटींच्या मालमत्तेवर टाच ; बाबा सिद्दीकी यांच्याभोवती ईडीचा फास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

वांद्रे पश्‍चिम येथील के. सी. मार्ग परिसरातील एसआरए प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याबाबतची तक्रार स्थानिक स्वयंसेवीने 2012 मध्ये केली होती. त्यानुसार तेथील जमात ए जमुरिया झोपडपट्टीतील काही रहिवाशांच्या नावाने एकापेक्षा अधिक खोल्या मिळवण्यासाठी बनावट शिधावाटप पत्रिका, फोटोपास, दुकान परवाने पुरावा म्हणून एसआरए विभागाकडे सादर करण्यात आले.

मुंबई : वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील (एसआरए) गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पिरामिड डेव्हलपर्सच्या 462 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली. याप्रकरणी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यासह अन्य आरोपींवर यापूर्वीच ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. 

ईडीने टाच आणलेल्या मालमत्तेत 33 फ्लॅट्‌सचा समावेश आहे. या फ्लॅटसाठी बनावट कागदपत्रांच्या साह्याने संमती मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. एसआरए विभागाकडून अधिकचा एफएसआय मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केले. या अधिकच्या एफएसआयमधून बाजूच्या इमारतीत अधिकचे फ्लॅट बांधण्यात आले. याप्रकरणी मनी लॉंडरिंग झाल्याचा ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार फ्लॅटवर टाच आणण्यात आली. या कारवाईमुळे बाबा सिद्दीकी यांच्या भोवतालचे फास ईडीने आणखी आवळले आहेत. या अधिकच्या एफएसआयमुळे बांधण्यात आलेल्या फ्लॅटमधून एक हजार 800 ते दोन हजार कोटी कमावण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. 
 

असा झाला गैरव्यवहार 

वांद्रे पश्‍चिम येथील के. सी. मार्ग परिसरातील एसआरए प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याबाबतची तक्रार स्थानिक स्वयंसेवीने 2012 मध्ये केली होती. त्यानुसार तेथील जमात ए जमुरिया झोपडपट्टीतील काही रहिवाशांच्या नावाने एकापेक्षा अधिक खोल्या मिळवण्यासाठी बनावट शिधावाटप पत्रिका, फोटोपास, दुकान परवाने पुरावा म्हणून एसआरए विभागाकडे सादर करण्यात आले. त्याच्या साह्याने झोपु योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या सात इमारतींमध्ये बेकायदा मालमत्ता मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या माध्यमातून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय होता. त्यानुसार 2014 मध्ये याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

गेल्या वर्षापासून तपास 

ईडीनेही वांद्रे येथील एसआरए गैरव्यवहारप्रकरणी बाबा सिद्दीकी, रफीक मकबुल कुरेशी, नजमुद्दीन मिठी बोरवाला यांच्यासह तीन कंपन्यांविरोधात 31 मार्च 2017 ला एन्फोर्समेंट केस इन्फोर्मेशन रिपोर्ट (गुन्हा) दाखल केली होती. या प्रकरणी ईडीने गेल्या वर्षी मे महिन्यात सात ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. त्यानंतर याप्रकरणी बाबा सिद्दीकी यांना समन्स पाठवून ईडीने जून 2017 मध्ये त्यांची चौकशीही केली होती. 

Web Title: Baba Siddiqui 462 Crore Property have been seized Enforcement Directorate