बदलापूरमध्ये ‘उत्सव स्त्री-सन्मानाचा’

बदलापूरमध्ये ‘उत्सव स्त्री-सन्मानाचा’

बदलापूर - जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून शिवसेना शहर शाखेच्या सहकार्याने व महिला आघाडीच्या शहर सचिव स्वप्ना पाटील यांच्या पुढाकाराने ‘उत्सव स्त्री-सन्मानाचा’ हा कार्यक्रम बदलापूरमध्ये झाला. या कार्यक्रमाला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. महिलांनी एकत्र येऊन बदलापूर ‘कचरामुक्त’ करावे, असे आवाहन आयोजक स्वप्ना पाटील यांनी या वेळी केले. महिलांविरुद्धची विकृती या सुसंस्कृत शहरात येऊ नये म्हणून शिवसेना आणि शिवसेनेची महिला आघाडी सज्ज असल्याचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी या वेळी सांगितले.      

महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने बदलापूरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या या कार्यक्रमांत नृत्य व गायन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. पश्‍चिम विभागाची प्राथमिक फेरी ४ मार्चला; तर पूर्व विभागाची प्राथमिक फेरी ५ मार्चला झाली. दोन्हीकडे मिळून साडेचारशेच्या वर स्पर्धक सहभागी झाल्याने पारितोषिके वाढवण्यात आली होती. शनिवारी मराठी शाळा, गांधी चौक, बदलापूर पूर्व येथे झालेल्या या स्पर्धेत अंतिम विजेत्यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच महिलांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे ‘मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कारा’चे मानकरी ठरलेल्या श्‍यामसुंदर जोशी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष वामन म्हात्रे, शिवसेना गटनेते श्रीधर पाटील, मसूद कोहारी, शिवसेना शहर सचिव प्रकाश सावंत, महिला आघाडीप्रमुख वृषाली गोगावले, महिला बालकल्याण समिती सभापती नेहा आपटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘मुंबईची सुकन्या’ ठरलेली बदलापूरमधील गायिका रेश्‍मा चतुरे, टेबल टेनिस स्पर्धेत जागतिक स्तरावर ज्युनियर गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रुती अमृते, महिला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत चार वेळा सुवर्णपदक पटकावणाऱ्या मीनल भोईर, निवेदिका दीपाली केळकर आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संगीतकार कौशल इनामदार व अभिनेत्री केतकी थत्ते उपस्थित होते.

कात्रपमध्ये बंदिस्त सभागृह 
बदलापूरमध्ये दीड वर्षात २७ सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे झाली असून आणखी ७२ रस्ते काँक्रीटचे होणार आहेत. एक ते दीड वर्षात कात्रप येथे साडेपाचशे आसनक्षमता असलेले बंदिस्त नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. शिरगाव येथे तीन एकराचे क्रीडांगण उभारण्याचे काम सुरू झाले असून कात्रप येथेही १२ एकराचे क्रीडा संकुल उभारण्याचे काम एक ते दीड महिन्यात सुरू होणार आहे. ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव व चार ओपन जिम सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी या वेळी दिली. बदलापूर सेफ सिटी व्हावी यासाठी तीन कोटी  खर्च करून चौका-चौकात सीसी टीव्ही बसवण्याचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार असल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले. 

बदलापूर हे सांस्कृतिक शहर असून या शहराचे सांस्कृतिक वैभव टिकवण्याचे काम शिवसेना आणि शिवसेनेची महिला आघाडी करत आहे. 
- वामन म्हात्रे, नगराध्यक्ष.  

महिलांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास शहर कचरामुक्त होऊ शकेल. आजही स्त्री-भ्रूणहत्येसारख्या समस्या कायम असून त्याविरोधात महिलांनी लढा द्यावा.
- स्वप्ना पाटील, शहर सचिव, शिवसेना महिला आघाडी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com