बांबूच्या सायकलवरून 4400 किलोमीटर प्रवास!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016


आम्ही मोहिमा अनेकदा आखतो; मात्र त्याच्या प्रायोजकत्वासाठी आम्हाला अनेक कंपन्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. या वेळी गोदरेज कंपनीने स्वतःहून आमच्या मोहिमेला सहकार्य देण्यासाठी संपर्क साधला. अशा मोहिमांबद्दल कॉर्पोरेट कंपन्यांनी असेच सहकार्य केले तर अनेक विक्रम करता येतील.
- प्रिसिलिया मदन

‘बेटी पढाव‘चा प्रचार करण्यासाठी तरुणीची मोहीम; गोदरेज कंपनीचे प्रायोजकत्व
मुंबई - सायकलिंग असो किंवा ट्रेकिंग, कोणतीही मोठी मोहीम आखताना आधी चाचपणी करावी लागते ती प्रायोजकांची. एवढ्या मोठ्या प्रवासासाठी प्रायोजकत्व सगळ्यात महत्त्वाचे असते; मात्र तुमच्या डोक्‍यात एखादी मोहीम आहे आणि प्रायोजक तुमच्याकडे स्वतःहून चालत आला तर? हे घडले आहे अवघ्या 22 वर्षीय प्रिसिलिया मदन या मुलीसोबत.

पनवेल-कन्याकुमारी हा तब्बल 1800 किलोमीटरचा एकट्याने केलेला सायकल प्रवास, पनवेल-खारदुंग, ओडिसा, मनाली-खारदुंग अशा केलेल्या सायकल मोहिमा प्रेसिलियाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळेच कन्याकुमारी-खारदुंग अशी तब्बल 4 हजार 400 किलोमीटरची मोहीम आखत असलेल्या सायकल मोहिमेसाठी गोदरेज कंपनीने स्वतःहून पुढाकार घेऊन प्रायोजकत्व देऊ केले आहे. त्यासाठी कंपनीने खास बांबूंची सायकलही तिला व तिचा सहकारी सुमित याला दिली आहे. तब्बल 60 दिवसांच्या या प्रवासातील खर्चही कंपनी करणार आहे.

गोदरेजची किमया
बांबूंनी बनवलेली इको फ्रेंडली आणि अत्यंत हलकी सायकल गोदरेजने खास या मोहिमेसाठी बनवली आहे. त्याला "आयएसओ‘ मार्कही दिला आहे. ती लांबच्या प्रवासासाठीही उत्तम आहे. लवकरच ती कंपनी बाजारात आणणार आहे.

अशी आहे मोहीम
प्रिसिलिया मदन आणि सुमित पारिंगे हे कन्याकुमारी ते खारदुंग अशा तब्बल 60 दिवसांच्या सायकल मोहिमेसाठी निघणार आहेत. 11 जुलैला मुंबईहून ते निघतील. 14 जुलैपासून कन्याकुमारीहून मोहिमेला सुरुवात होईल. "बेटी पढाओ‘ या मोहिमेअंतर्गत त्यासाठी 50 लाखांच्या निधीचे लक्ष्य त्यांनी ठरवले आहे. जमलेला निधी "फ्युएलड्रीम‘ या कंपनीद्वारे ऑनलाईन गोळा केला जाईल. दिल्लीमधील शाळांतील मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या "इम्पॅक्‍ट‘ या स्वयंसेवी संस्थेला तो दिला जाणार आहे. वर्षभरात 1500 मुलींच्या शिक्षणावर तो खर्च केला जाईल.
 

Web Title: Bamboo bike 4400 kilometers to travel!