काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस होत असल्याने काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे...

मुंबई - धारावी हा मिश्र लोकवस्तीचा भाग आहे. येथे महापालिका निवडणुकीचा महासंग्राम सुरू झाला आहे. या विभागाने काँग्रेसला मोठी साथ दिली आहे. आता येथे शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार चुरस होत असल्याने काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना धारावीने नेहमीच साथ दिली. येथे आता शिवसेना, भाजपने मोठी ताकद लावली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची दाट शक्‍यता आहे. त्यात काँग्रेसच्या उमेदवारांना भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ही झुंज अटीतटीची होणार आहे.

प्रभाग क्रमांक १८४ मध्ये शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी, काँग्रेसचे बाबू खान, मनसेचे राजेंद्र सोनवणे, रिपाइंचे (आठवले गट) नितीन दिवेकर, भाजपचे मनी बालन, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे प्रीतम शेट्टी, राष्ट्रवादीचे संतोष शिंदे आणि ‘एमआयएम’चे हयात शेख यांच्यात लढत होणार आहे. त्यात काँग्रेसचे बंडखोर दीपक काळे यांची भर पडली आहे. बंडखोरी काँग्रेससाठी अडचणीची ठरण्याची शक्‍यता आहे. प्रभाग क्रमांक १८३ मधून गंगा माने (काँग्रेस) आहेत. ऐनवेळी मनसेने अंजली वेंगुर्लेकर यांना ‘एबी फॉर्म’ देऊ केला होता; मात्र त्या भाजपच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज भरून मोकळ्या झाल्याचे समजते. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या उमेदवार ऊर्मिला वैती आहेत. वॉर्ड क्रमांक १८६ मध्ये शिवसेनेचे वसंत नकाशे, भाजपचे श्रीरंग कानडे आणि काँग्रेसचे संदेश जावळेकर यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघात मनसेने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे त्याचा फायदा नकाशे यांना होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. येथे काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना-भाजपमधील झुंज येथे रंगतदार ठरेल.