मुंबईत 'बौद्ध साहित्य सर्जन दिन' संपन्न!

mumbai
mumbai

मुंबई : बौद्ध तत्वज्ञानाच्या आधारे मार्क्सवादाचे भारतीयकरण केले तरच भारतात मार्क्सवाद यशस्वी होऊ शकतो असे महापंडित राहुल सांकृत्यायन यांचे म्हणणे होते, असे प्रतिपादन विद्रोही कवी आणि साहित्यिक डाॅ. श्रीधर पवार यांनी मुंबईत बोलताना केले. सद्धम्म साहित्य संघाच्या वतीने महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा 9 एप्रिल हा   जन्मदिन 'बौद्ध साहित्य सर्जन दिन' म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने छबिलदास हायस्कूल दादर मुंबई, येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डाॅ. श्रीधर पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी सद्धम्म पत्रिकेचे संपादक प्रा. आनंद देवडेकर होते. 

डाॅ. श्रीधर पवार आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात पुढे म्हणाले की, राहुल सांकृत्यायनजींचा जीवनप्रवास हा परिवर्तनशील होता. विद्यार्थ्यीदशेत पारंपरिक शिक्षणाला सोडचिठ्ठी देणारे राहुलजी सुरवातीला आर्य समाजिस्ट झाले,नंतर हिंदू साधू झाले व शेवटी राहुल सांकृत्यायन नाव धारण करून बौद्ध भिक्खू झाले. त्यानी घुमक्कड होऊन विश्वभ्रमंती केली. बौद्ध तत्वज्ञानाचा आणि साहित्याचा प्रभाव असलेले राहुल सांकृत्यायन हे कम्युनिझमच्याही प्रभावात होते. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा आनंद देवडेकर आपल्या भाषणात म्हणाले की, कुशाग्र बुद्धीच्या राहुलजीनी प्रचंड साहित्य संपदा निर्माण केली विशेषतः पालि - संस्कृत बौद्ध साहित्य आणि तत्वज्ञान या संदर्भात राहुलजीनी केलेले काम आणि तिबेट मधून दुर्मिळ बौद्ध ग्रंथांची हस्तलिखिते जीवावर उदार होऊन भारतात आणण्यासाठी उपसलेले कष्ट भावी पिढीसाठी प्रेरणादायी  आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेवरील प्रतिक्रिया देताना राहुलजी म्हणाले होते की, 'डाॅ.बाबासाहेब आंबेडकरजीने इस भारतभूमि मे बुद्धीझम का ऐसा खंबा गाड दिया है की, कोइ माय का लाल उसे हिला नही सकता. . . इससे केवल पद दलित समाज का ही नही, बल्की पुरे देश का भी भला होगा. . ! '

बौद्ध साहित्यिक गौतम शिंदे व अस्मितादर्शकार डाॅ गंगाधर पानतावणे यांना आदरांजली वाहून सुरू झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उत्तम भगत यांनी केले. 'बौद्ध साहित्य सर्जन दिना'चे महत्त्व समजावून सांगून झालेल्या कवी संमेलनाचे सूत्रसंचालनही प्रा. उत्तम भगत यांनी केले. 

गझलकार भागवत बनसोडे, सुनील ओवाळ, गजानन गावंडे, सदा बांबुळकर, आनंद देवडेकर, कवी संजय भिसे,उत्तम भगत, श्रीधर पवार, संदीप शिंदे, अशोक नागकिर्ती, प्रि. लता इंगळे धर्मदास मोहिते, जगताप मॅडम यांनी आपल्या काव्यरचना सादर करून कविसंमेलनात बहार आणली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com