बेलापूरमध्ये वाहतुकीचा बोजवारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

बेलापूर - नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवरील फिफाच्या सामन्यामुळे दुपारी १ नंतर अवजड वाहनांना बंदी असल्याने सोमवारी (ता. ९) सकाळीच  मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने रस्त्यावर आली. त्यामुळे बेलापूर किल्ले गावठाण जंक्‍शनवर चारही बाजूंना जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. याचा फटका सकाळी कामावर आणि शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी निघालेले नागरिक व विद्यार्थी यांना बसला.

नेरूळमधील पाटील स्टेडियमवर फिफा ज्युनियर विश्‍वचषक फुटबॉलचे सामने सुरू आहेत. स्टेडियमच्या समोर सायन-पनवेल महामार्ग आहे. येथून पुणे, उरण आदी ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. उरण येथील न्हावा-शेवा बंदराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी सारख्या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून वाहतूक पोलिसांनी फिफा सामन्यांच्या दिवशी मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. सामन्यांच्या दिवशी दुपारी १ नंतर ही बंदी असल्याने न्हावा-शेवा बंदराकडे जाणाऱ्या आणि बंदराकडून बाहेर पडणाऱ्या वाहनांनी त्यामुळे सकाळीच रस्त्यावर गर्दी केली. कामानिमित्त बाहेर पडलेली वाहने आणि मालवाहू अवजड वाहने सोमवारी सकाळी एकाच वेळी रस्त्यावर आल्याने बेलापूर जंक्‍शन येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. यामुळे सीबीडी आणि उरणच्या दिशेने जाणारी दुचाकी, चारचाकी, रिक्षा, बस आदी वाहनांच्या पाम बीच मार्गावर एनआरआय सिग्नलपर्यंत रांगा लागल्या होत्या. उरणकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहने, चारचाकी आदी वाहनांच्या अपोलो रुग्णालयापर्यंत रांगा लागल्या होत्या. सीबीडीमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांच्या रांगा सेक्‍टर- १५ मधील पेट्रोल पंपापर्यंत लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक झाली.

बेलापूर जंक्‍शन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. फिफामुळे स्टेडियम परिसरातून मोठ्या वाहनांना दुपारी १ नंतर ये-जा करण्यासाठी बंदी असल्याने सकाळीच मोठ्या प्रमाणावर वाहने बाहेर पडली. बेशिस्त वाहनचालकांनी उलटसुलट वाहने घातल्याने वाहतूक कोंडी झाली होती. 
- अभिजित मोहिते, पोलिस निरीक्षक (वाहतूक)