बेलापूर जंक्‍शनवर कोंडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

बेलापूर - सीबीडी बेलापूर येथील बेलापूर जंक्‍शन हा उरण रोडवरील महत्त्वाचा चौक आहे. या मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सिग्नल बसवला आहे; परंतु वाहनांची संख्याच इतकी वाढली आहे की त्यामुळे सिग्नलवर रोजच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. येथे लाल सिग्नल जास्त वेळ आणि हिरवा कमी वेळ असल्याने वाहनचालकांसाठी तो डोकेदुखी बनला आहे. त्यामुळे येथे उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

उरण येथे न्हावा शेवा बंदर आहे. या बंदराकडे ये-जा करणारी अवजड वाहने दिवस-रात्र या रस्त्यावरून धावत असतात. नव्याने विकसित होत असलेल्या उलवे नोडमध्ये नागरी वस्ती वाढत असल्याने बस, रिक्षा आणि खासगी वाहनांची रहदारीही वाढत आहे. सीबीडी-वाशी पाम बीच मार्ग याच रस्त्याला बेलापूर जंक्‍शन, पालिका मुख्यालयाजवळ जोडला आहे. या चौकात चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. उरणकडे ये-जा करणाऱ्या वाहनांमध्ये प्रामुख्याने ट्रेलर, कंटेनर यासारख्या अवजड वाहनांची संख्या जास्त आहे. बेलापूर जंक्‍शन येथील सिग्नल यंत्रणेत उरणसाठी १४० सेकंद लाल आणि फक्त ३५ सेकंद हिरवा सिग्नल असतो. 

या मार्गावर १४० सेकंदांत शेकडो वाहनांची रांग लागते आणि ३५ सेकंदांत त्यातील मोजकीच वाहने जातात. यामुळे सकाळी आणि सायंकाळी किमान तीन वेळा सिग्नल लागल्यावर वाहनांचा नंबर येतो. यामुळे वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीही हाच रस्ता असल्याने येथील वाहतूक आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येथे उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिक करत आहेत.

न्हावा शेवा बंदराकडे जाण्यासाठी बेलापूर जंक्‍शन सिग्नलवर खूप वेळ जातो. हिरवा दिवा काही सेकंद सुरू असतो. त्यामुळे वाहनांची रांग लागते. बराच वेळ रांगेत थांबावे लागते. या रस्त्यावर आणखी वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे चौकात उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे.
- नीलेश भोसले, वाहनचालक
  
उरण मार्गावर सायंकाळी वाहनांची जास्त वर्दळ असते. ती आटोक्‍यात ठेवण्यासाठी सीबीडी-वाशी या पाम बीच मार्गावर सायंकाळी लाल सिग्नलची वेळ वाढवण्यात आली आहे. या ठिकाणी उड्डाणपूल होणार आहे. महिनाभरात त्याचे काम सुरू होईल.
- अभिजित मोहिते, पोलिस निरीक्षक (वाहतूक)

Web Title: belapur news traffic CBD