खारकोपर-उरण रेल्वेला ब्रेक

Kharkopar-Uran Railway
Kharkopar-Uran Railway

नवी मुंबई - बेलापूर-उरण रेल्वेमार्गावर खारकोपर रेल्वेस्थानकापर्यंतचे काम वेगात सुरू असताना वन विभागाच्या उदासीनतेमुळे सिडकोच्या या कामाला ब्रेक लागला आहे. सिडकोला गरज असलेल्या १८ पैकी चार हेक्‍टरच्या भूसंपादनाला वन विभागाने परवानगी दिलेली नाही, असे सिडकोच्या रेल्वे विभागातून सांगण्यात आले. यामुळे खारकोपर-उरण रेल्वे प्रकल्पाचे काम रखडण्याची शक्‍यता आहे.

बेलापूर-सीवूड्‌स-उरण या २७ किलोमीटर रेल्वेमार्गासाठी सिडकोला १८ हेक्‍टर जागेची गरज आहे. यात रेल्वेस्थानकांसह रूळ, पार्किंग व इतर संकुले बांधण्यात येणार आहेत. या १८ हेक्‍टर जागेपैकी बेलापूरपासून सीवूडस्‌, उलवे, बामणडोंगरी, मोरावे, खारकोपर या गावांपर्यंतची जागा सिडकोच्या अखत्यारित असल्यामुळे सिडकोला बेलापूर ते खारकोपरपर्यंतच्या १६ किलोमीटर कामात काहीच अडचण आली नाही. या मार्गावर रुळांचे काम पूर्ण होऊन सिडकोने रेल्वेस्थानकेही बांधण्यास सुरुवात केली आहे. या मार्गावरील जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे; मात्र खारकोपरपासून उरणपर्यंतच्या कामासाठी सिडकोला आणखी चार हेक्‍टर जागेची गरज आहे. यातील गव्हाणपासून जासईपर्यंतची चार हेक्‍टर जागा वन विभागाच्या मालकीची असल्यामुळे त्या जागेच्या संपादनासाठी सिडकोला वन विभागाच्या परवानगीची गरज आहे. या जागेची परवानगी घेण्यासाठी सिडकोकडून वन विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे; मात्र त्याला अनेक महिने झाले तरी वन विभागाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ही जागा संपादित करता येत नाही. परिणामी खारकोपरपासून उरणपर्यंतच्या रेल्वे रुळाचे काम करता येत नाही. त्यामुळे सिडकोने सीवूडस्‌पासून बामणडोंगरी, तरघर, खारखोपर या रेल्वेस्थानकांची कामे वेगाने सुरू केली आहेत. 

मागण्यांचा अडसर
सिडकोने जागा खरेदी केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला आलेल्या अनेक अनुभवामुळे गव्हाण ते जासईदरम्यानच्या ग्रामस्थांनी सिडकोला जागा देण्यास विरोध केला आहे. रेल्वे प्रकल्पासाठी काही गावांची सुटलेली जागा सिडकोला पुन्हा अधिग्रहित करायची आहे; मात्र ही जागा संपादित करताना ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता सिडकोला करावी लागणार आहे. तोपर्यंत रेल्वे प्रवाशांना बेलापूर ते उरणपर्यंतच्या सेवेसाठी २०२२ उजाडण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com