नवीन वर्षात बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील 100 बस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

मुंबई - "बेस्ट'ची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने प्रशासन भाडेतत्त्वावरील बस चालवण्याचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. नवीन वर्षांत बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील 100 बस दाखल होण्याची शक्‍यता आहे. विरोधकांनी या प्रस्तावास जोरदार विरोध करीत भाड्याच्या बससाठी सत्ताधाऱ्यांची एवढी तत्परता का, असा सवाल केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बसचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

बेस्टच्या ताफ्यातील सुमारे 650 बस भंगारात निघाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या बस कमी झाल्याने प्रवाशांना तासन्‌ तास वाट पाहावी लागत आहे. याचा परिणाम प्रवाशांच्या संख्येवर होत आहे. हे पाहता बसचा समतोल कसा राखायचा, याचा पेच प्रशासनासमोर उभा राहिला आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाकडून भाडेतत्त्वावरील बसचा प्रस्ताव आणण्यात येणार आहे. पुढच्या महिन्यात एक बस प्रायोगिक तत्त्वावर दाखल होणार आहे. त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारीत 100 बस दाखल होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 300 बस दाखल होतील, अशी माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली. भाडेतत्त्वावरील बस चालवण्याचा प्रस्ताव नऊ वर्षांपूर्वी बेस्ट समितीसमोर आला होता. त्यासाठी आता निविदा काढण्यात येणार आहेत; मात्र अद्याप प्रस्ताव तयार झाला नसल्याचे समजते.

कॉंग्रेस आक्रमक
बेस्ट प्रशासन आणि सत्ताधारी बसमधील गाड्यांच्या ताफ्याचा समतोल ठेवण्याबाबत सक्षम नाहीत. त्यामुळे परिवहन सेवा डबघाईला आली असल्याचा आरोप बेस्ट समितीतील कॉंग्रेसचे सदस्य रवी राजा यांनी केला आहे. बेस्टच्या मालकीच्या गाड्या वाढवण्यापेक्षा भाडेतत्त्वावरील बससाठी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची एवढी तत्परता का, असा सवालही त्यांनी केला आहे. याबाबत प्रस्ताव आल्यास आम्ही त्याला विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.