बेस्ट चालवणार खासगी बसेस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई - बेस्टला आर्थिक तुटीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने खासगीकरणाचा मार्ग अवलंबल्याचा आरोप होत आहे. बेस्ट आता 50 बसेस भाड्याने घेऊन त्या वापरणार आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 61 रुपये 41 पैसे मोजण्यात येणार असून तसा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बेस्टच्या चालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्‍यता आहे. महापालिका भविष्यात कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी आऊटसोर्सिंगचा मार्ग स्वीकारणार असल्याचे सूतोवाच आयुक्तांनी अर्थसंकल्पात केले असतानाच बेस्टच्या या प्रस्तावामुळे त्याची सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत.

मार्चमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत झाला नाही. पैशांअभावी बेस्टवर ही नामुष्की ओढवली आहे. पुढील महिन्यातही पगार वेळेवर होईल याची खात्री नाही. त्यातच पालिकाही कोणतीही ठोस मदत करण्यास अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे बस विकत घेण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा खासगी बसेस भाड्याने घेण्याचा पर्याय बेस्ट प्रशासनाने स्वीकारला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून बेस्टने 50 बस भाड्याने घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्यात पाच हजार किलोमीटरप्रमाणे बस भाड्याने घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 61 रुपये 41 पैसे मोजण्यात येणार आहेत. प्रसन्ना पर्पल मोबिलिटी सोल्युशन या कंपनीकडून या एकमजली बस भाड्याने घेण्यात येणार आहेत. या बससाठी कंपनीचा चालक असेल; तर बेस्टचा वाहक असेल. एवढेच नाही, तर बसची रंगसंगती बेस्ट बसप्रमाणे असल्यामुळे खासगी बस व बेस्ट बसमधील फरक समजणार नाही.

चालक खासगी कंपनीचा असल्याने भविष्यात चालकांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्‍यता आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी भविष्यात आऊटसोर्सिंगवर भर देण्याचे सूतोवाच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पात केले आहे. त्याचा पहिला टप्पा बेस्टपासून सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कामगार कपातीची शक्‍यता
भाडेतत्त्वावर बस खरेदीला कॉंग्रेसचे बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी विरोध केला आहे. बेस्टची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून याला 20 वर्षे बेस्टमध्ये सत्ता भोगणारी शिवसेना-भाजप जबादार असल्याचा आरोपही राजा यांनी केला आहे. सध्या 50 बस घेण्यात येणार असल्या तरी येत्या काळात सर्व बस भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे बेस्टमधील चालकांवर संक्रांत येणार असून मोठी कामगार कपात होण्याची भीती राजा यांनी व्यक्त केली.

Web Title: best drive to private bus