बेस्ट-पालिकेचा अर्थसंकल्प लवकरच एकत्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न; दोन दिवसांत प्रशासनाचा अहवाल

बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न; दोन दिवसांत प्रशासनाचा अहवाल
मुंबई - 'बेस्ट' उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्रित मांडण्याबाबत सोमवारी महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावर बेस्ट प्रशासनाला दोन दिवसांत अहवाल सादर करण्यास महापौरांनी सांगितले आहे. बेस्टच्या आर्थिक तोट्यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी महापौरांच्या दालनात बैठक होईल.

आर्थिक तोट्यामुळे बेस्टला या महिन्यात कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेवर देता आला नाही. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सोमवारी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या दालनात गटनेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. बेस्ट आणि पालिकेचा अर्थसंकल्प एकत्रित मांडल्यास बेस्टला पालिकेतून आर्थिक मदत करणे शक्‍य होईल, असे मत शिवसेनेच्या काही सदस्यांनी या वेळी मांडले. याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना महापौरांनी बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांना केल्या. महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने बेस्ट आणि पालिकेचा अर्थसंकल्प एकत्रित मांडण्याचे आश्‍वासन दिले होते. याबाबत बेस्ट आणि पालिकेच्या कायद्यात तरतूद करावी लागणार आहे.

बेस्टने पालिकेकडे एक हजार कोटींची मागणी केली आहे. पालिकेने 2013 मध्ये बेस्टला 1600 कोटींचे कर्ज 10 टक्के व्याजाने दिले होते. त्यातील 900 कोटींची परतफेड बेस्टने केली आहे. उर्वरित रकमेवरील व्याज माफ करण्याची मागणीही बेस्टने केली असल्याचे समजते.

केंद्र व राज्याचीही जबाबदारी
बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महापालिका मदत करील. ती कोणत्या स्वरूपात असावी, याबाबत सविस्तर अहवाल दोन दिवसांत सादर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्य व केंद्र सरकारलाही मुंबईतून कर मिळतो. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारनेही बेस्टसाठी आर्थिक साह्य करावे, अशी भूमिका महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी मांडली.

पालिकेच्या अन्य प्रकल्पांचाही विचार
महापालिकेचा 2017-18 चा अर्थसंकल्प बुधवारी (ता. 29) स्थायी समितीला सादर होणार आहे. त्यामुळे बेस्टला आर्थिक मदत देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी लागेल. ही तरतूद करताना पालिकेच्या इतर प्रकल्पांना त्याचा फटका बसणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यामुळे बेस्टच्या आर्थिक तोट्याबाबत निर्णय घेण्यासाठी पुढील बैठक बुधवारी होणार आहे.

Web Title: best-municipal budget