भिवंडीत शिवसेनेला धक्का

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

भिवंडी - ठाणे जिल्ह्यासह भिवंडी परिसरात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. तालुक्‍यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कारिवली आणि कालवार ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी शिवसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. परिणामी याचा ज्येष्ठ पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुखांनी चांगलाच धसका घेतला आहे.

भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत कारिवलीच्या सरपंच कविता गीतेश नाईक, शिवसैनिक गीतेश रामदास नाईक यांच्यासह कारिवलीतील शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे कार्यकर्ते संजय नाईक, लक्ष्मण पाटील, विजय नाईक आदींनी शिवसैनिकांच्या भाजपप्रवेशासाठी प्रयत्न केले. कारिवलीपाठोपाठ शिवसेनेच्याच कालवारच्या सरपंच अर्चना परशुराम म्हात्रे, शिवसैनिक परशुराम म्हात्रे, प्रकाश म्हात्रे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कारिवली आणि कालवार येथील ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. तालुक्‍यातील महत्त्वाच्या आणि मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये दोन्ही ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्‍यात भाजपची स्थिती आणखी मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

शिवसेना महायुतीचे  भाजपसमोर आवाहन
भिवंडीत भाजपची मजबूत होणारी स्थिती रोखण्यासाठी शिवसेनेने तयारी सुरू केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपशी युती न करता इतर पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे यांनी सांगितले. शिवसेनेच्या महायुतीमुळे भाजपला कृषी उत्पन्न बाजार समितीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे भाजपने फोडाफोड्याच्या राजकारणाला सुरुवात केली. आगामी निवडणुकांत महायुतीचा पॅटर्न राबविल्यास भाजपसमोरील अडचणींमध्ये मोठी वाढ होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

खासदार कपिल पाटील यांनी तालुक्‍यातील अनेक गावांचा योजनाबद्ध पद्धतीने विकास सुरू केला. त्याचप्रकारे आमच्या गावाचाही विकास होईल, असा विश्‍वास आहे. 
- अर्चना म्हात्रे, सरपंच, कालवार.