भोंदूबाबाचा तरुणीवर लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

मुंबई - शरीरातील कथित दैवी शक्तींच्या साह्याने व्यवसायात प्रगती करून देण्याचे भासवत भोंदूबाबाने 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोंदूबाबा विरोधात चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अंकुश शेट्ये असे या भोंदूबाबाचे नाव असून तो मालवणीतील रहिवासी आहे. याप्रकरणी तक्रारीनुसार, पीडित तरुणीची आई आणि वडिलांमध्ये कौटुंबिक वाद होता. तसेच व्यवसायातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पीडितेचे वडील मानसिक तणावाखाली होते. त्याचवेळी एका परिचित व्यक्तीच्या माहितीवरून पीडित मुलीच्या वडिलांनी मालवणीतील या भोंदूबाबाची भेट घेतली. त्यावेळी व्यवसायात भरभराट करण्याचे आमिष दाखवले. एवढ्यावरच न थांबता या आरोपीने भोंदूबाबाच्या अघोरी विद्येच्या नावाखाली पीडितेच्या घरी होमहवन करण्यास सांगितले. तसेच पीडित तरुणीच्या कुटुंबातील वादाचा फायदा उचलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 2010 पासून हा प्रकार सुरू होता.

दरम्यान, पीडित तरुणीने याबाबत कोणाला काही सांगितल्यास काळ्या जादूने घराचे वाटोळे करण्याची धमकी दिली होती. अत्याचाराने असह्य झालेल्या 19 वर्षीय तरुणीने आपल्या व्यथा एका नातेवाईकास सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार चारकोप पोलिसांनी बलात्कार, धमकावणे, फसवणूक आणि अमानुष प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.