पाणी टंचाई आमच्या पाचवीलाच पुजलेली..

wada
wada

वाडा : स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही आदिवासी भागात रस्ते, पाणी व वीज या मुलभूत सुविधा सरकार देऊ शकलेले नाही. गाव- पाड्यात जायला धड रस्ता नाही, वीज काही भागांत पोहचली असली तरी रात्री मिणमिणत्या उजेडात महिलांना स्वयंपाक व विद्यार्थांना अभ्यास करावा लागतो.तर पाणी टंचाई ही दरवर्षी प्रमाणे आताही आहे. पाणी टंचाई ही आमच्या पाचवीलाच पुजलेली असल्याच्या भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या. 

वाडा तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली ओगदा ही ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीच्या अखत्यारित ओगदा, फणसपाडा, पाचघर, खोडदा व तिळमाळ ही पाच महसुली गावे असून चौदा पाडे आहेत. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2772 इतकी आहे. शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली ही ग्रामपंचायत आहे. हा भाग अतिदुर्गम असल्याने प्रशासनाचे फारसे लक्ष येथे नाही असा आरोप आदिवासी नागरिक करीत आहेत. त्यामुळे मुलभूत सुविधांपासून ही ग्रामपंचायत वंचित आहे. ताडमाळ आणि मुहमाळ या पाड्यात जायला आजही रस्ता नाही.

पायवाट व डोंगर चढून या पाड्यात जावे लागते.या पाड्याची 150 ते 175  लोकसंख्या असून त्यांना जिकीरीचे जीवन जगावे लागत आहे. या गावातील नागरिक आजही खड्ड्यातील पाणी पित आहेत.येथे टंचाई जाणवत आहे मात्र टॅकरला जायला रस्ता नसल्याने प्रशासन येथे काहीच करू शकत नाही.बैलगाडीने येथे पाणी पुरवठा केला जातो.  

या ग्रामपंचायतीच्या पुवेॅकडील टोकरेपाडा,दिवेपाडा,सागमाळ व जांभुळपाडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.गावात असलेल्या विहीरी व कुपनलिका कोरड्या पडल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागतआहे. दरवर्षी मार्च महिन्यापासूनच येथे टंचाई जाणवायला सुरुवात होते असे येथील महिला माया दोडे यांनी सांगितले.सकाळ सायंकाळी येथील नागरिक अंघोळ व महिला कपडे धुण्यासाठी एक किमी अंतरावर असलेल्या नदीवर जात असतात अशी माहिती ग्रामस्थ बबन दोडे यांनी दिली.  

पाणी टंचाईची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासनाने एक टॅकर दोन ते तीन दिवसाआड चालू केले.एक दिवशी सागमाळ, टोकरेपाडा तर दुस-या जांभुळपाडा असे टॅकर टाकले जाते.असे दोडे यांनी सांगितले.ओगदा या ग्रामपंचायतीतील गावे ही वैतरणा जलप्रकल्प क्षेत्रात येत असून या गावाशेजारीच वैतरणा धरण बनविण्याचा शासनाचा विचार आहे.त्याचे सवेॅक्षण झाले असून ही गावे विस्थापित होणार आहेत.त्यामुळे त्यांना एखादी योजना घ्यायची असल्यास या धरणाची बाब पुढे येते व त्यांच्या योजना बारगळतात असे ग्रामस्थांनी सांगितले.  

दररोज टँकर द्या..
ओगदा ग्रामपंचायतीतील सागमाळ, टोकरेपाडा, दिवेपाडा, जांभुळपाडा या गाव पाड्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून प्रशासनाने या पाड्यांसाठी दोन तीन दिवसातून एकदा टॅकर सुरू केले आहे. मात्र सदरचे टॅकर आज या पाड्यावर तर दुसऱ्या दिवशी त्या पाड्यावर टाकले जाते.मात्र हे पाणी नागरिकांना पुरत नसल्याने प्रत्येक पाड्यावर दररोज टॅकर द्यावा अशी मागणी या ग्रामपंचायतीचे सरपंच भाष्कर लाथड यांनी केली आहे. 

आंदोलनाचा इशारा 
शासन व प्रशासन पाणी टंचाईचा सामना करण्यास सपशेल अपयशी ठरले असून दररोज या गाव   पाड्यांना टॅकर न दिल्यास आदिवासी नागरिक पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील असा गंभीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विभाग अध्यक्ष गणेश पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com