मनोरुग्णाने पाठविला जैविक हल्ल्याचा मेल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

मुंबईसह बंगळूरवर हल्ल्याचा संदेश

मुंबईसह बंगळूरवर हल्ल्याचा संदेश
मुंबई - सीरियातील जैविक हल्ल्याप्रमाणे दहशतवादी टोळी मुंबईसह बंगळूर शहरावर अशा जैवरासायनिक हल्ल्याच्या तयारीत आहे, असा ई-मेल पोलिसांना आला. सीरियातील जैविक हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आहेत. याप्रकरणी बंगळूरमधून एका मनोरुग्णाला ताब्यात घेण्यात आले आहे.

बंगळूरमध्ये राहणारी एक व्यक्ती सहा महिन्यांपासून मुंबई आणि बंगळूर पोलिसांच्या संकेतस्थळावर वारंवार मेल करत होती. या मेलमध्ये मुंबई व बंगळूर शहरांत दहशतवादी टोळी जैविक हल्ला करण्याच्या प्रयत्नात असून, या दहशतवाद्यांनी देशातील महत्त्वाच्या शहरांना यापूर्वी लक्ष्य केले होते, असे या ई-मेलमध्ये म्हटले होते. हा हल्ला पाण्यातून अथवा हवेतून करता येतो. या हल्ल्यात माझ्यासह अनेकांचा बळी जाण्याचा धोका आहे, अशी माहिती त्याने दिली होती. काही लिंकही त्याने मेलला जोडल्या होत्या. शहरातील महत्त्वाच्या एंट्री पॉइंटवर श्‍वानपथके आणि मेटल डिटेक्‍टरच्या मदतीने रासायनिक पदार्थ पोलिसांनी शोधून काढले पाहिजेत, अशा सूचना त्याने केल्या होत्या. सहा महिन्यांपासून मुंबई व बंगळूर पोलिसांच्या संकेतस्थळांवर हे ई-मेल येत होते.

पोलिसांनी "एटीएस', राज्य गुप्तवार्ता विभाग, सायबर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मुंबईवरील संभाव्य दहशतवादी हल्ल्याची भीती लक्षात घेऊन "एटीएस'ने बंगळूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर बंगळूरमधील सुरक्षा यंत्रणेने दिलीप शहा नावाच्या व्यक्तीला शोधून काढले. तो मनोरुग्ण असल्याचे सिद्ध झाल्यावर सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. याबाबतची माहिती "एटीएस'ला मिळाल्यानंतर दिलीपला मुंबईत न आणता बंगळूर पोलिसांनीच त्याच्यावर कारवाई केली, असे "एटीएस'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.