शिधावाटपासाठी बायोमेट्रिक प्रणाली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई - मुंबईतील शिधापत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. यात एक लाख 28 हजार शिधापत्रिका बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील 55 हजार शिधापत्रिका तातडीने रद्द करण्यात आल्या. रेशन व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी यापुढे प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला बायोमेट्रिक पद्धतीने धान्य दिले जाईल. लवकरच ही यंत्रणा राबवली जाणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात दिली. भुसावळ (जि. जळगाव) येथील बनावट शिधापत्रिकाप्रकरणी स्वस्त धान्य दुकानावरील कारवाईसंदर्भात विधानसभा सदस्य डॉ. संजय रायमूलकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बापट बोलत होते. या चर्चेत सदस्य संजय सावकारे, सुभाष साबणे आणि अमर काळे यांनीही सहभाग घेतला.