सर्व गाड्यांमध्ये 2022 पर्यंत बायोटॉयलेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

हरित लवादासमोर रेल्वेचे प्रतिज्ञापत्र; प्रदूषणमुक्तीचा प्रयत्न

हरित लवादासमोर रेल्वेचे प्रतिज्ञापत्र; प्रदूषणमुक्तीचा प्रयत्न
मुंबई - देशातील सर्व रेल्वे गाड्यांमध्ये 2021-22 पर्यंत बायोटॉयलेट बसवले जातील, असे प्रतिज्ञापत्र रेल्वेने हरित लवादासमोर सादर केले आहे. रेल्वेच्या 55 हजार डब्यांमध्ये दोन लाख 20 हजार बायोटॉयलेटची गरज आहे. त्यापैकी 2016 पर्यंत 54 हजार 188 बायोटॉयलेट बसण्यात आले. मात्र यावर समाधान न झाल्याने दरवर्षी किती बायोटॉयलेट बसवणार आणि सर्व रेल्वे गाड्यांमध्ये ते बसवण्याचे उद्दिष्ट कसे पूर्ण करणार, याचा वर्षनिहाय अहवाल सादर करा, असे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले.

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील शौचालयांतून थेट रुळांवर मानवी विष्ठा टाकली जाते. त्यामुळे पर्यावरणाची समस्या निर्माण होते. याविरुद्ध "ह्युमन राईट्‌स ऍण्ड लॉ डिफेन्डर्स' या सामाजिक न्याय व मानवी हक्क विषयावर प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांच्या संशोधनावर आधारित याचिका हरित लवादासमोर दाखल झाली आहे. भारतात रेल्वे रुळांवर दररोज तीन हजार 980 मेट्रिक टन मानवी विष्ठा पडते, असे कॅगच्या अहवालात म्हटले आहे.

थांबलेल्या आणि धावत्या रेल्वेतून पडणाऱ्या या विष्ठेमुळे रुळांशेजारील वस्त्यांत प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या विष्ठेमुळे जल आणि वायू प्रदूषण होते. रुळाशेजारील वस्त्यांतील भू-जलस्रोत प्रदूषित झाले आहेत. दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे.

मोठ्या नद्यांच्या पुलांवरून आणि तलांवावरून धावणाऱ्या रेल्वेतून पडणाऱ्या विष्ठेमुळे जलप्रदूषण होत असल्याचे अभ्यास याचिकेत म्हटले आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्या. यू. डी. साळवी आणि डॉ. अजय देशपांडे यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली.

"सीएजी'च्या अहवालाचा दाखला देत 20 वर्षांपासून सुरू असलेला रेल्वेतील ग्रीन टॉयलेटचा प्रयत्न अपुरा असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील असीम सरोदे यांनी निदर्शनाला आणून दिले. वैद्यकीय आणि तांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास रेल्वे टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. इंटीग्रेटेड रेल्वे मॉर्डनायझेशन प्लॅन 2001 नुसार योग्य तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी 2007 तर मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यासाठी 2010 पर्यंत मुदत होती. मात्र 2015 मध्येही बायोटॉयलेट बसवण्यात आले नाहीत, असे ऍड. सरोदे यांनी न्यायाधिकरणाच्या निदर्शनाला आणले. त्यावर पर्यावरण पूरक बायोटॉयलेटस उभारण्याचे काम सुरू असल्याचे रेल्वेने सांगितल्याने याबाबतची सुनावणी दोन एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली.

स्वच्छतेच्या मार्गासाठी...
55 हजार रेल्वेचे डबे
दोन लाख 20 हजार बायोटॉयलेटची गरज
54 हजार 188 2016 पर्यंत बसविलेले बायोटॉयलेट
3980 टन रुळांवर रोज पडणारी मानवी विष्ठा

Web Title: biotoilet in railway