उल्हासनगरात भाजप बॅकफूटवर

उल्हासनगरात भाजप बॅकफूटवर

उल्हासनगर - उल्हासनगरच्या राजकारणात आपणच मोठा भाऊ, हे सिद्ध करण्यासाठी भाजपने सुरुवातीपासूनच कंबर कसली होती. पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारून टीम ओमी कलानीशी हातमिळवणी करून त्यांच्या रूपाने  महापौरपदाची स्वप्ने पाहिली; मात्र ओमी यांचा उमेदवारी अर्जच बाद झाल्याने भाजपच्या एका गोटात निराश वातावरण आहे; तर दुसरीकडे  शिवसेनेला आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत.

रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी ओमी यांना तीन अपत्ये असल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला. त्यानंतर नियमानुसार ओमींचा अर्ज बाद झाल्याचे वृत्त सर्वत्र वाऱ्यासारखे पसरले. ही बातमी आल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांना आनंद लपवता आला नाही. शिवसेनेला  शह देऊन उल्हासनगरात भाजपची ताकद वाढवण्यासाठी डोंबिवलीतील भाजपच्या बड्या नेत्याच्या विशेष पुढाकाराने ओमी व भाजप जवळ आले. भाजपने शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी आधीच आरपीआयशी हातमिळवणी करून त्यांना १२ जागा देऊ केल्या होत्या; मात्र ओमी आणि भाजपचे मीलन झाले. त्यानंतर आरपीआयला दिलेल्या जागांत बदल होतील, असे ओमीने स्पष्ट केल्यावर त्यांनी शिवसेनेशी घरोबा केला. ज्या टीम ओमी कलानीच्या जीवावर भाजपने निवडणुकीचा मोठा डाव आखला, त्यातील हुकमी एक्काच निवडणुकीच्या रिंगणातून  फेकला गेला आहे.

‘चर्चा तर होणारच’ 
टीम ओमी कलानीला झुकते माप देऊन आरपीआयला नाराज केलेल्या भाजपला आरपीआयने चांगलाच धडा शिकवला. मोदी लाट असूनही ज्योती कलानी यांनी भाजपच्या कुमार आयलानी यांचा पराभव करत भाजपला धक्का दिला होता. आयलानी यांचा टीम ओमी कलानीच्या हातमिळवणीसाठी विरोध होता. ओमी आणि भाजपची मैत्री आयलानींच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी फारशी पोषक नसल्याचेही  बोलले जात होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com