नालेसफाईच्या पाहणीत भाजप नगरसेवक गायब

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

मुंबई - मुंबई महापालिकेच्या परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबू नये, यासाठी नालेसफाईची पाहणी भाजपतर्फे करण्यात आली. या वेळी सोबत न आलेल्या भाजप नगरसेवकांची मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी कानउघाडणी केली आहे. हा दौरा मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी होता.

नालेसफाईची पाहणी केल्यानंतर शेलार यांनी रात्री या सर्व नगरसेवकांना कॉन्फरन्स कॉल करून त्यांची हजेरी घेतली.

मुंबई महापालिकेशी संबंधित कुठल्याही पद्धतीच्या रणनीतीत भाजप नगरसेवकांचा सहभाग आवश्‍यक असून, यापुढे हलगर्जी दाखवल्यास संबंधित नगरसेवकांवर "कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात येणार आहे. शिवसेनेचे 86 आणि भाजपचे 84 नगरसेवक आहेत. इतके नगरसेवक असूनही शेलार यांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यात केवळ 10 ते 12 नगरसेवक सहभागी झाले होते. मरोळ, वर्सोवा परिसराच्या या दौऱ्यात शेलार यांच्यासोबत स्थानिक आमदार दिसत होते, पण नगरसेवकांची अनुपस्थिती अनेकांना खटकत होती. शेलार यांना पत्रकारांनी याविषयी विचारल्यावर "पक्षपातळीवर याची दखल घेतली जाईल' असे उत्तर शेलार यांनी दिले होते. रात्री दौरा संपल्यावर त्यांनी 84 पैकी सुमारे निम्म्या नगरसेवकांना फोन लावले आणि काही जणांची कॉन्फरन्स घेऊन जाब विचारला.