खडी दिली, आता रस्ता करा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

मुंबई - खडीअभावी रस्त्यांची कामे रखडली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाणींमधील खडी उपलब्ध करून दिली असून पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करून दाखवा, असे आव्हान भाजपने शिवसेनेला दिले आहे.

मुंबई - खडीअभावी रस्त्यांची कामे रखडली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाणींमधील खडी उपलब्ध करून दिली असून पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करून दाखवा, असे आव्हान भाजपने शिवसेनेला दिले आहे.

पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याने दगडखाणी बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी खडीचा पुरवठा बंद झाल्याने मुंबईतील रस्त्यांची कामे रखडली. खडी नसल्याने कंत्राटदारांनी रस्त्यांची कामे थांबविली असल्याची माहिती प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत दिली होती. कामात खंड पडू न देणे ही कंत्राटदारांची जबाबदारी आहे. त्यांनी कुठूनही खडी आणावी. कंत्राटदारांना प्रशासन का पाठीशी घालत आहे, अशी भूमिका घेत प्रशासनावर समिती सदस्यांनी जोरदार हल्ला चढविला होता. भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी रविवारी (ता. २१) मुलुंड भागातील रस्त्यांच्या कामाचा पाहणी दौरा केला. काही ठिकाणी अजूनही रस्त्यांच्या कामात दिरंगाई आहे. या भागातील चाफेकर बंधू मार्गावरील कामे खोळंबली आहेत. हरिओम नगरमधील रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याचे त्यांना दिसले. मुंबईतील रस्त्यांची अवस्था तशीच आहे. रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी खडी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. साधनसामग्री देण्याचे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे आता रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे ही जबाबदारी शिवसेनेची आहे. भाजपने तसे आव्हान शिवसेनेला दिले आहे. रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्यास मुंबईकरांना मोठ्या अडचणींशी सामना करावा लागेल, अशी भीती भाजपने व्यक्त केली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे करणे आता शिवसेनेसाठी कसोटी ठरली आहे.