मोदीविरोधक आम्हाला अमान्य - आशीष शेलार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

मुंबई कोणाची हा प्रश्‍न नेहमीच असतो.

मुंबईही मराठी माणसाचीच आहे; पण एखाद्याला जवळ करायचे आणि दुसऱ्यावर अन्याय करायचा, ही भाजपची भूमिका नाही. "सबका साथ, सबका विकास' ही भाजपची भूमिका आहे. त्या लोकांनी मराठी भाषा दिन साजरा केला का? मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलणारे आम्हाला मान्य नाहीत, असा अप्रत्यक्ष इशारा शिवसेनेला देतानाच वाईट वागणाऱ्यांना चांगले वागायला सांगा, असा सल्लाही शुक्रवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी दिला. "कॉफी विथ सकाळ' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक भाजपचेच निवडून येतील, असा विश्‍वास व्यक्त करताना आगामी महापालिका निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढवली जाईल, असे संकेत दिले.

*आगामी महापालिका निवडणूक भाजप स्वतंत्र लढणार का?
- संघटन सर्वच बाजूने वाढत आहे. सर्व समाज सोबत येत आहे. विधानसभेला आम्हाला यश दिले. मुंबई विधानसभा आम्ही मुंबईच्या मुद्द्यांवर लढवली होती, तेव्हा कार्यकर्त्यांना स्वतंत्र लढावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. कुठल्याही पक्षाने आमच्याएवढे सदस्य दाखवावे. 25 लाख ऑनलाईन सदस्य झाले. आता साडेएकोणीस लाखांहून अधिक सदस्य ऍक्‍टिव्ह आहेत. 15 आमदार आहेत. त्यामुळे महापालिका आपल्या बळावर जिंकण्याचे मत आहे. पण तो निर्णय नाही. निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.

*भाजपने शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून यश मिळवलं, अशी टीका होतेय.

- भाजपने शिवसेनेमुळे यश मिळवलेले नाही. 1980 मध्ये युती झाली तेव्हा आमचे पाच आमदार होते. त्यांचा एकही आमदार नव्हता. महापालिकेतही आमचे नगरसेवक वाढत आहेत. त्यांचे कमी होत गेले. आम्ही वाढलोय. दोन्ही पक्ष एकत्र होते म्हणून पूर्वी सत्ता मिळाली. बाळासाहेबांचे नेतृत्व होते हे मानायलाच पाहिजे; पण गेल्या निवडणुकीत नागरिकांनी विकासाला पाठिंबा दिला.

*भाजप आता प्रचंड आक्रमक झाली आहे.
पक्षाचे बळ वाढवणे म्हणजे स्वबळावर लढणे, असे होत नाही. दोन्ही पक्षांत वाद दिसतोय म्हणजे आम्ही भूमिका घेतोय. यापूर्वी भूमिका घेणं आम्ही टाळत होतो. आम्ही भूमिका घेऊ नये, असे गृहीत धरणे म्हणजे आमच्यावर अन्याय होईल.

*पूर्वी भूमिका का घेतली जात नव्हती?
-पूर्वीही भूमिका घ्यायचो. पालिकेतील क्रॉफर्ड मार्केटचा घोटाळा, तुरटीचा घोटाळा, सॅपमधील घोटाळा याबद्दल पूर्वी आम्ही आवाज उठवलाच आहे. यापुढेही बोलत राहू.

- रस्त्यावर भ्रष्टाचाराविरोधात बोलता; पण पालिकेत दोषी कंत्राटदारांना कामे दिली जातात.

ज्या पुलांची कामे देण्याचा प्रस्ताव होता, तो प्रशासनाने कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यापूर्वी बनवला होता. तो पूलही होणं गरजेचं होतं. मुख्यमंत्र्यांनी पालिकेतील घोटाळ्याची व्यवस्था मोडून काढली आहे. कॉंग्रेसच्या काळात लहान-मोठ्या कंत्राटदारांना कंत्राट देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन यायचे. आता दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्यासाठी फोन येतात. हा फरक महत्त्वाचा आहे. या मुख्यमंत्र्यांनी व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी पोलिसांना मोकळीक दिली आहे.

- मुंबई कोणाची हा प्रश्‍न नेहमीच असतो.

मुंबईही मराठी माणसाचीच आहे; पण एखाद्याला जवळ करायचे आणि दुसऱ्यावर अन्याय करायचा, ही भाजपची भूमिका नाही. "सबका साथ, सबका विकास' ही भाजपची भूमिका आहे. त्या लोकांनी मराठी भाषा दिन साजरा केला का? मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न केला.