'मातोश्री'चे वागणे बदलावे ही भाजपची इच्छा!

- मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 11 मार्च 2017

जि.प. अध्यक्षपदाचा तिढा अद्याप कायम; जबाबदारी शिवसेना मंत्र्यांवर
मुंबई - कोणत्याही अटी, शर्ती न टाकता मुंबईच्या महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदावर पाणी सोडल्यानंतर शिवसेनेने झाले गेले विसरून नवा अध्याय सुरू करावा, अशी भाजपची अपेक्षा आहे. मात्र, आता या कामासाठी "मातोश्री'च्या वाऱ्या न करण्याचा निर्णय भाजपने घेतला असून, ही जबाबदारी आता शिवसेना मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.

जि.प. अध्यक्षपदाचा तिढा अद्याप कायम; जबाबदारी शिवसेना मंत्र्यांवर
मुंबई - कोणत्याही अटी, शर्ती न टाकता मुंबईच्या महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदावर पाणी सोडल्यानंतर शिवसेनेने झाले गेले विसरून नवा अध्याय सुरू करावा, अशी भाजपची अपेक्षा आहे. मात्र, आता या कामासाठी "मातोश्री'च्या वाऱ्या न करण्याचा निर्णय भाजपने घेतला असून, ही जबाबदारी आता शिवसेना मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.

भूतकाळाची मीमांसा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्हीकडील चार-चार मंत्र्यांसह बसावे, चर्चा करावी अन्‌ सारे खुलेपणाने व पारदर्शीपणे बोलून झाले गेले विसरावे व सहजीवन सुरू ठेवावे, असा भाजपचा प्रस्ताव आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा विषय पुढे न्यावा, असा विचार भाजपने बोलून दाखवला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहकारी पक्षाने अकारण तणाव वाढवला असल्याने लोकहिताची कामे मार्गी लागत नसल्याची खंत भाजपचे ज्येष्ठ नेते व्यक्त करीत आहेत.

शिवसेनेचा मान राखून महापौरपदाचा मुद्दा सामोपचाराने सोडवणाऱ्या भाजपला जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मदत करणे हा युतीधर्म असल्याची भावना भाजपमध्ये बळावते आहे. शिवसेनेत मात्र अद्याप यासंबंधात कोणत्याही "शस्त्रसंधी'ची शक्‍यता तपासली गेलेली नाही. शिवसेनेच्या विस्तारासाठी भाजपला वाट न देणे आवश्‍यक असल्याचे पक्षातील काही जहाल नेत्यांचे मत आहे. ते लक्षात घेत जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी कोणताही शब्द देण्याची शिवसेनेची इच्छा नसल्याचे समजते. पंचायत समितीत स्थानिक आमदारांनी आग्रह धरला, तर भाजपसमवेत जाण्यास आडकाठी करायची नाही का, यावर शिवसेनेत विचार सुरू आहे. देशातील पाच विधानसभा निवडणुकांचे कल लक्षात घेतल्यावर शिवसेनेची भूमिका निश्‍चित होईल, असे काही नेत्यांनी स्पष्ट केले.

सर्वार्थाने नमते घेतले तरी शिवसेनेचे नेतृत्व शांत होत नसल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. सतत मोठेपणा दिल्यानंतरही निर्णय होत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी युतीचे भवितव्य काय ते ठरवावे अन्‌ तसे वागावे असे भाजपला वाटते. मात्र, त्यासाठी आता आर्जवे करण्याऐवजी सत्तेची फळे चाखणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांवर भाजपने ही जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याशी यासंबंधात चर्चाही केली आहे. हे मंत्री "मातोश्री'वर काय रदबदली करतात, याकडे भाजपचे लक्ष आहे. दरम्यान, शिवसेना आमदारांनी केलेल्या मागण्यांमध्ये लक्ष घालून न्याय देण्याचे आश्‍वासन देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला शांत ठेवणे पसंत केले आहे.

Web Title: bjp wish to Matoshri behavior change