काळ्या टॅक्‍सीचा प्रवास "ऍप'मुळे सुरक्षित 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुंबई - ओला, उबर टॅक्‍सी जशी इंटरनेटवर "ट्रेस' होते, त्याच धर्तीवर मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीसाठी इलेक्‍ट्रॉनिक यंत्रणा उपब्लध करून देण्यासाठी खास "ऍप' बनवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. 

काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीच्या धंद्यावर ओला-उबर टॅक्‍सीमुळे संक्रांत आली आहे, यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हेमंत टकले यांनी आज तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले, ""मुंबईत 30 लाख काळ्या-पिवळ्या टॅक्‍सी आहेत. या टॅक्‍सी टिकाव्यात, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र ओला, उबरला ग्राहक पसंती देत असतील, तर ती टॅक्‍सी धंद्यातील स्पर्धा आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्‍सी संघटनांनी त्यांचा धंदा, विश्वासार्हता टिकवण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत.'' 

काळी- पिवळी टॅक्‍सीसाठी "ऍप' बनवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते, त्याचे काय झाले, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुढच्या तीन महिन्यांत काळी-पिवळी टॅक्‍सीसाठी "ऍप' निर्माण करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे ओला, उबरप्रमाणे काळी-पिवळी टॅक्‍सी इंटरनेटवर "ट्रेस' होईल. परिणामी, या टॅक्‍सीचा प्रवास सुरक्षित होईल, असे सभागृहास सांगितले. 

Web Title: Black taxi Travel Safe for App