काळी-पिवळी टॅक्‍सी, रिक्षांवर 94 टक्के प्रवासी नाराज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

ग्राहक पंचायतीचे सर्वेक्षण; ओला-उबेरला पसंती
मुंबई - मुंबई ग्राहक पंचायतीच्या सर्वेक्षणात 94 टक्के नागरिकांनी काळी-पिवळी टॅक्‍सी-रिक्षांविरोधात राग व्यक्त केला आहे. ओला-उबेरच्या टॅक्‍सीसेवेला त्यांनी पसंती दिली. टॅक्‍सी-रिक्षांचे चालक अनेकदा भाडे नाकारतात, असे निरीक्षण नागरिकांनी नोंदवले. मात्र, या सर्वेक्षणावर बोट ठेवत मुंबई टॅक्‍सीमेन्स युनियनने टॅक्‍सी उद्योगाची प्रतिमा डागाळून बहुराष्ट्रीय कंपन्यांना मदत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
 
मुंबई ग्राहक पंचायत समितीने 27 ते 31 ऑगस्टदरम्यान हे ऑनलाईन सर्वेक्षण केले. मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील 76 हजार 169 नागरिकांनी याला प्रतिसाद दिला. त्यातील 94 टक्के नागरिकांनी काळी-पिवळी टॅक्‍सी-रिक्षांच्या चालकांविरोधात राग व्यक्त केला. ओला-उबेरची सेवा त्यांच्या तुलनेत चांगली आहे, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून काढण्यात आला. या सर्वेक्षणातील माहितीनुसार, 11 टक्के लोक ओला-उबेरची सेवा रोज वापरतात. 15 टक्के प्रवासी आठवड्यातून एकदा, तर 13 टक्के प्रवासी महिन्यातून एकदा खासगी टॅक्‍सीचा वापर करतात. सर्वेक्षणात टॅक्‍सीला एक हजार 586, तर रिक्षाला चार हजार 103 जणांनीच पसंती दर्शवली आहे. हा अहवाल मुंबई ग्राहक पंचायत लवकरच केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालय, राज्याचा परिवहन विभाग व इतर विभागांना पाठवणार आहे.

मुंबई टॅक्‍सीमेन्स युनियन नाराज
या सर्वेक्षणाबाबत मुंबई टॅक्‍सीमेन्स युनियनने नाराजी व्यक्त केली आहे. यातून बहुराष्ट्रीय कंपन्यांचा व्यावसायिक हेतू साध्य करण्यासाठी मदत केली जात आहे. परिवहन खात्याने आखलेल्या नियमांच्या चौकटीतच टॅक्‍सी चालवली जाते. मात्र ओला-उबेर चालक लूट करत आहेत. युनियन सर्व टॅक्‍सीचालकांचे वर्तन सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे जनरल सेक्रेटरी ए. एल. क्वाड्रोज यांनी सांगितले.