उल्हासनगरातील दृष्टिहीन विद्यार्थीनी उपजिल्हाधिकारी

दिनेश गोगी
सोमवार, 28 मे 2018

उल्हासनगर : सर्व दिसत असल्याने अभ्यासात खेळण्यात तरबेज असतानाच, वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी दृष्टी गमावलेली मात्र दिव्यदृष्टीच्या बळावर थेट आयएएस परीक्षा उत्तीर्ण करणारी उल्हासनगरातील दृष्टिहीन विद्यार्थीनी प्रांजल पाटील उपजिल्हाधिकारी या पदावर विराजमान झाली आहे. तिने आज केरळातील एरनाकुलममध्ये पदभार स्विकारला असून तिच्यावर चोहोबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.

उल्हासनगर : सर्व दिसत असल्याने अभ्यासात खेळण्यात तरबेज असतानाच, वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी दृष्टी गमावलेली मात्र दिव्यदृष्टीच्या बळावर थेट आयएएस परीक्षा उत्तीर्ण करणारी उल्हासनगरातील दृष्टिहीन विद्यार्थीनी प्रांजल पाटील उपजिल्हाधिकारी या पदावर विराजमान झाली आहे. तिने आज केरळातील एरनाकुलममध्ये पदभार स्विकारला असून तिच्यावर चोहोबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.

आकाशवाणी मध्ये काम करतानाच सामाजिक बांधिलकी जपणारे एल.बी.पाटील-ज्योती पाटील या दाम्पत्याला प्रांजल आणि निखिल हे दोन अपत्य. दोन्ही अभ्यासात खेळण्यात तरबेज. अशात एक मोठा आघात पाटील परिवाराच्या नशिबी आला. प्रांजलने वयाच्या आठव्या वर्षी दृष्टी गमावली आणि पाटील यांच्या पायाखालची जमीनच सरकली.पण प्रांजलनेच तिच्या पालकांचे ध्येय वाढवले. इतिहास घडवण्याचा संकल्प बोलून दाखवला. तिने दहावी पास करून 12 वि पर्यंत शिक्षण चांदीबाई कॉलेज मधून पूर्ण केले. पाटील यांनी प्रांजलला मुंबईच्या सेंट जेव्हीएस कॉलेज मध्ये दाखला मिळवून दिला. निखिल त्याच्या या जिद्दी बहिणीला रोज सोडवण्याचे आणि आणण्याचे काम लिलया पार पाडत होता. प्रांजलने तिथे बीए ची डिग्री मिळवली. तिने यापेक्षा अधिक शिक्षणाची इच्छा व्यक्त केल्यावर पाटील यांनी प्रांजल सोबत दिल्ली गाठून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश घेतला.

याठिकाणी प्रांजलने एमए,एमफिल आणि पीएचडी पूर्ण.तिने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्धार केला.आणि एमपीएससी परीक्षा दिली.त्यात ती उत्तीर्ण झाली.पण यूपीएससी परीक्षा देण्याची आणि कलेक्टर पर्यंत झेप घेण्याची दिव्यदृष्टी तिने ठेवली आणि दिड दोन वर्षापूर्वी तिने यूपीएससी परीक्षा सर केली.तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी प्रांजलचा पालिकेत जाहीर गौरव करून तिला शाबासकी दिली होती.

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारीचा दर्जा मिळालेल्या प्रांजलला विविध खात्याच्या नोकरीची ऑफर देण्यात आली. मात्र शिक्षणानुसार मनासारखी पोस्ट मिळत नसल्याने तिने ह्या नोकऱ्या पत्करल्या नाहीत. तिने चांगली पोस्ट दिल्यास देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात नोकरी करण्याची तयारी केंद्र शासनाकडे बोलून दाखवल्यावर प्रांजलची केरळमधील एनराकुलम मध्ये नियुक्ती होताच तिने आज पदभार स्विकारला. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ.बालाजी किणीकर, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, गटनेते रमेश चव्हाण, मनसे अध्यक्ष बंडू देशमुख, कायद्याने वागा लोकचळवळचे राज असरोंडकर, मराठी पत्रकार संघ, आदींनी प्रांजल हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
 

Web Title: blind student becomes Deputy Collector from ulhasnagar