आता उद्धव ठाकरे यांचे भवितव्य काय?

Uddhav Thackray
Uddhav Thackray

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपला रोखण्यात अपयश आल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य दोलायमान झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेनेला मुंबईतील जागांमध्ये अत्यंत किरकोळ अशी भर टाकता आली. तसेच राज्यात ठाणे वगळता शिवसेनेच्या जागांमध्ये कोठेही भरीव वाढ झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेची ताकद आणि बार्गेनिंग पॉवरही कमी होण्याची शक्‍यता आहे. परिणामी शिवसेनेचे उपद्रवमूल्य कमी होणार आहे. भाजपसाठी ही जमेची बाजू आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. 

दोन वर्षांपूर्वीच्या मोदी लाटेचा फायदा घेऊन भाजपने आपले हातपाय राज्यभर पसरले. एकेकाळी शिवसेनेपेक्षा पुष्कळ मागे राहणाऱ्या भाजपने आता शिवसेनेला बरोबरीत गाठले आहे. राज्यात तर भाजप सेनेच्या पुढे गेला आहे. भाजपची ही वाढ थांबवण्यात किंबहुना त्यांच्याबरोबरीने आपला पक्ष वाढवण्यात ठाकरे यांना अपयश आल्याचे दिसत आहे. कदाचित पुढच्या निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता स्थापन करू शकतो. मुंबईपुरते बोलायचे झाल्यास भाजपला मुंबईत आणखी वाढायचे असल्यास शिवसेनेच्या सर्व गडांना कमकुवत करण्यावाचून पर्याय नाही. 

भाजपची वाढ शिवसेनेच्या मुळावर येणार हे निश्‍चित आहे. भाजपची ही आगेकूच रोखण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्यात आहे का, असा प्रश्‍नही आता किंवा पुढेमागे विचारला जाऊ शकतो. या वेळी शिवसेनेतून हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते भाजपमध्ये गेले. त्यापैकी प्रभाकर शिंदे विजयी झाले आणि बबलू पांचाळ यांच्या पत्नीही विजयी झाल्या. पांचाळ स्वतः आणि नाना आंबोले यांच्या पत्नी पराभूत झाल्या, ही बाब वेगळी. पण भविष्यात भाजपची वाढ आणि त्या पक्षाचे राष्ट्रीय स्वरूप लक्षात घेता आपल्या अस्तित्वासाठी शिवसेनेतून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची संख्या वाढू शकते. अशा स्थितीत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या भवितव्याबाबत प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो, असे राजकीय पंडितांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com