नवा महापौर राणीच्या बागेत! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबईच्या नव्या महापौराला आता समुद्राची हवा अनुभवता येणार नाही. महापालिकेचे कामकाज सुरळीत सुरू झाल्यावर सध्याचे दादरमधील महापौर निवास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नव्या महापौराला आता भायखळ्यामधील राणीच्या बागेतील बंगल्यात राहायला जावे लागणार असल्याचे चित्र आहे. 

दादर शिवाजी पार्कमधील महापौर निवासात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे; मात्र अद्याप पालिकेकडे कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. महापालिकेचे कामकाज सुरळीत सुरू झाल्यानंतर महापौर निवासस्थान स्मारक समितीला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नव्या महापौरांचा गृहप्रवेश सध्याच्या महापौर निवासस्थानात होण्याचे कठीण वाटते. 

पालिका प्रशासनाने नवे महापौर निवास म्हणून राणीच्या बागेतील बंगल्याची निवड केली आहे. दीड-दोन वर्षांपासून हा बंगला रिक्त असून त्याची तात्पुरती डागडुजीही करण्यात आली आहे. दादरमधील निवासस्थानानंतर भायखळ्यातील बंगला मध्यवर्ती ठिकाणी असल्याने प्रशासनाने त्याबाबतचा प्रस्ताव पुढे केला आहे. 

बंगला मोठा; पण... 
भायखळ्यातील बंगला सध्याच्या दादरच्या निवासस्थानापेक्षा मोठा आहे. सध्याचे निवासस्थान हे चार हजार 500 चौरस फुटाचे आहे. राणीच्या बागेतील बंगला सहा हजार चौरस फुटांचा आहे; पण मुंबईत समुद्रकिनारी राहणे प्रतिष्ठेचा प्रश्‍न आहेच. त्याचबरोबर दादरसारखे मध्यवर्ती ठिकाण हे राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच बंगल्याचा परिसरही ऐसपैस आहे. 

असे आहेत इतर पर्याय 
- मलबार हिलमध्ये महापालिकेचे दोन बंगले आहेत. त्यात सध्या अतिरिक्त आयुक्तांचे निवासस्थान आहे; मात्र प्रवासाच्या दृष्टीने ते अत्यंत गैरसोयीचे आहेत. महापौरांना भेटायला शहरभरातून सर्वसामान्य नागरिक येत असल्याने हे दोन्ही पर्याय अडचणीचे आहेत. 
- ताडदेवमधील कारमायकल मार्गावर महापालिका आयुक्तांचा बंगला आहे; मात्र ती जागा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची आहे. तेथील बंगला महापौर निवासासाठी हस्तांतरित करण्यास राज्य सरकारबरोबर प्रशासनही तयार नाही. 

Web Title: BMc New mayor bungalow in rani baug