जयाजी सुर्यवंशी अत्यंत बोगस माणूस -राजू शेट्टी

गोविंद तुपे : सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 जून 2017

राज्यात शेतकऱ्यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला आणि काही तासातच या संपात फुट पडल्याची चर्चा सुरू झाली. पण हे सर्व उथळ नेत्यांमुळे झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींनी केला आहे.

मुंबई : राज्यात शेतकऱ्यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला आणि काही तासातच या संपात फुट पडल्याची चर्चा सुरू झाली. पण हे सर्व उथळ नेत्यांमुळे झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींनी केला आहे.

तसेच येत्या 8 जून रोजी नाशिक येथे सर्व नेत्यांची बैठक घेऊन आंदोलनाची नव्याने उभारणी करणार असल्याची माहिती शेट्टी यांनी सरकारनामाला दिली. 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी विविध संघटनांनी एकत्र येऊन शेतकरी संपाची हाक दिली. त्याला शेतकऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे सरकारवर काही प्रमाणात दबावही तयार झाला होता. मात्र काही फुटीर आणि उथळ नेत्यांमुळेच या आंदोलनात फुट पडली आहे.

त्यामुळे लोकांच्या आग्रहास्तव मी याच आंदोलनाची पुन्हा एकदा नव्याने उभारणी करणार आहे.

त्यासाठी 8 जून रोजी नाशिक याठिकाणी एक बैठक बोलावण्यात आली आहे. या प्रश्‍नावर काम करणाऱ्या सर्व संबधीत संघटनांनाही या बैठकीसाठी बोलावले जाणार आहे. पुन्हा एकदा ताकदीनं हे आंदोलन उभे करून सरकारला धारेवर धरून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे शेट्टी म्हणाले. 

सभेत भाषण केल्यासारखे मुख्यमंत्री बोलत आहेत. कोअर कमिटीमधील सदस्य म्हणून मुख्यमंत्र्याकडे बैठकीला गेलेलेही सरकारी भाषा बोलत आहे. विशेष म्हणजे जयाजीराव सुर्यवंशी हा तर अत्यंत बोगस माणूस आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीनंतर आमच्या स्वाभिमानीमध्ये येण्यासाठी इच्छूक होता. एवढेच नाही तर जयाजी सुर्यवंशीला आमच्या पक्षातून विधानसभेची उमेदवारीही हवी होती मात्र आम्ही त्याला प्रवेश दिला नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले