बसपाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग फसला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

मुंबई - उत्तर प्रदेशात बसपाला 19 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या पक्षाची निवडणुकीत मोठी पीछेहाट झाली आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी व्होटिंग मशीनमध्ये घोटाळा झाला असल्याचे म्हटले असले तरी या राज्यात बसपाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग फसला असल्याचे मत निकालानंतर जाणकारांनी व्यक्त केले आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशात बसपाला 19 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या पक्षाची निवडणुकीत मोठी पीछेहाट झाली आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी व्होटिंग मशीनमध्ये घोटाळा झाला असल्याचे म्हटले असले तरी या राज्यात बसपाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग फसला असल्याचे मत निकालानंतर जाणकारांनी व्यक्त केले आहे.

मायावती यांनी 2007 मध्ये उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळविले होते. त्यावेळी त्यांनी 206 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाची घसरण होत आहे. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग बसपाचे सर्वेसर्वा कांशिराम आणि मायावती यांनी केलेला प्रयोग आता फसत चालल्याचे चित्र या निवडणुकीत दिसले.

बसपाला या निवडणुकीत जनाधार टिकविता आला नाही. याबाबत ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अविनाश महातेकर यांनी उत्तर प्रदेशातील मायावती यांचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग फसल्याचे म्हटले आहे. मायावतींचे सोशल इंजिनिअरिंगपेक्षा त्यांनी या निवडणुकीत बचावात्मक पवित्रा घेतला. त्यात अखिलेश यादव आणि राहुल गांधी एकत्र आल्यामुळे दलित मतांचे, तसेच इतर समाज घटकांच्या मतांचे विभाजन झाल्याचे विश्‍लेषण महातेकर यांनी केले आहे. बसपाचा इतर समाजघटकांवर प्रभाव होता. दलित आणि मुस्लिमांची मते मिळविण्यात भाजपला यश आले आहे. केवळ स्मारके बनवून लोक सोबत राहत नाहीत. दर निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग बदलावे लागतात. तो बदल मायावती यांनी दिला नाही. त्यामुळे त्यांची उत्तर प्रदेशात पीछेहाट झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हा संभ्रमावस्थेतील विजय असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केले आहे. सगळेच पक्ष आता सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करू लागले आहेत. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांचे विभाजन झाले. भाजपने विकासाचे भ्रामक चित्र उभे केल्यामुळे त्यालाही मतदारांनी प्रतिसाद दिला. योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज आदींनी धार्मिक भावना चेतविल्या. त्याचाही फायदा भाजपला झाला. हार-जीत असली तरी इतक्‍या कमी जागा बसपा मिळतील, असे वाटले नव्हते. मात्र व्होटिंग मशीनमध्ये घोळ आहे, त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने तसेच केंद्र सरकारने घ्यायला हवी, अन्यथा लोकशाहीचे भवितव्य धोक्‍यात येईल, असे मत डांगळे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: bsp social engineering planning fail