म.रे. लेटमार्कच्या दुखण्याला उपाय काय?

म.रे. लेटमार्कच्या दुखण्याला उपाय काय?

एक्‍स्प्रेस, मालगाड्या, रुळावरील कचरा लोकलच्या वक्तशीरपणाच्या आड
मुंबई - सीएसटीपासून खोपाली-कसाऱ्यापर्यंत उपनगरीय लोकल प्रतिदिन तब्बल 70 हजार किलोमीटरचा प्रवास करतात. महिन्याभरापासून मध्य रेल्वेच्या लोकलचा लेटमार्कमध्ये वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वी केवळ देवदर्शन किंवा पर्यटनाला जाण्यासाठी असलेली स्थानके आता सर्वाधिक गर्दीची म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. दीड वर्षामध्ये दिवा, बदलापूर व टिटवाळा स्थानकात प्रवाशांच्या आंदोलनातून लोकलची संख्या वाढवा, हीच मागणी सातत्याने दिसून आली. त्याची परिणती टिटवाळा स्थानकातील प्रवाशांच्या "रेल रोको'तून झाली. प्रवाशांनी केलेल्या आंदोलनाने मध्य रेल्वेच्या प्रशासनाला धडकीच भरली. अन्य स्थानकांमध्येही प्रवाशांच्या "रेल रोको' करू, ही धमकी दिली. ही परिस्थिती सावरण्यासाठी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी प्रवासी संघटनांसोबत बैठक घेतली. यामध्ये लोकलच्या लेटमार्कची कारणे सांगत संघटनांना गप्प करण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. ठाकुर्ली, दिवा व कळवा येथील रेल्वे फाटक बंद करा, तुम्हाला लोकल वेळेवर चालवून दाखवतो, अशी भूमिका रेल्वेने घेतल्याने "रोगापेक्षा इलाज भंयकर' असल्याची प्रचिती उपस्थितांना आली. त्यानिमित्ताने मध्य रेल्वेच्या व्यग्र लोकल सेवेचा हा आढावा.

समस्या
* लोकल किती उशिरा येणार?

कल्याणच्या पुढे खोपोली व कसाऱ्यापर्यंत मध्य रेल्वेने ट्रेन मॅनेजमेंट सिस्टम (टीएमएस) यंत्रणा बसवलेली नाही. या कारणाने कल्याणच्या पुढील स्थानकांवर लोकल किती वेळेत येणार, याबाबत उद्‌घोषणा होत नाही. केवळ अनिश्‍चित कालावधीकरिता गाड्या उशिरा धावत असल्याची उद्‌घोषणा होते. टीएमएस यंत्रणा तातडीने सुरू करावी, अशी मागणी वाहतूकतज्ज्ञ गौरंग दमानी यांनी केली आहे.

रेल्वे रुळाला तडे
नोव्हेंबरपासून रेल्वे रुळाला तडे जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. केवळ थंडी हेच कारण नाही. मध्य रेल्वेच्या मार्गावर मांटुगा ते सायन, ठाण्याला पारसिक बोगद्यानंतर, चिंचपोकळी करीरोडदरम्यान शेजारच्या रहिवासी वस्तीमुळे रुळांची देखभाल करणे अवघड झाल्याचे अभियंता विभागाचे म्हणणे आहे. मोठ्या प्रमाणात सांडपाणी ट्रॅकवर येते. वारंवार स्थानिक पालिका प्रशासनाला सांगूनही सहकार्य मिळत नाही. प्रत्येक दीड किमी मार्गावर गॅंगमनची टीम सतत पाहणी करत असल्याने मोठी दुर्घटना अद्याप घडलेली नाही.

रेल्वे रुळांवर कचरा
विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यानच्या रेल्वे मार्गावर रहिवाशांकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे लोकलचा वेग ताशी 30 किमीपर्यंत आणला आहे. रेल्वे मार्गाच्या बाजूला संरक्षक भिंती उभारूनही रहिवासी रुळावरच कचरा टाकतात. पालिकेबरोबर पत्रव्यवहार करूनही परिस्थिती "जैसे थे' आहे. पावसाळ्यानंतर मध्य रेल्वेने मार्गावरून तब्बल 75 हजार क्‍युबिक मीटर कचरा उचलला. हा कचरा उचलण्याची जबाबदारी रेल्वेची नाही. आमचे काम लोकल चालवणे आहे, ही भूमिका मध्य रेल्वेचे डीआरएम रवींद्र गोयल यांनी बैठकीत घेतली.

एक्‍स्प्रेस व मालगाड्या
प्रतिदिन लोकलच्या 1660 फेऱ्या होतात. त्यांच्या वेळापत्रकात लांब पल्ल्याच्या एक्‍स्प्रेस व मालगाड्या आड येतात. जवळपास 100 मालगाड्या व 200 मेल किंवा एक्‍स्प्रेसची वाहतूक या मार्गावर होते. सकाळच्या गर्दीच्या वेळी एक्‍स्प्रेसवर बंदी आणण्याच्या संघटनांच्या प्रश्‍नावर ते अशक्‍य असल्याचे उत्तर प्रशासनाने दिले. गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा आल्यानंतर आटगाव, आसनगाव स्थानकात त्यांना थांबा देण्यात येतो; पण फार काळ त्या थांबवता येणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कल्याण स्थानकाचा अडथळा
पश्‍चिम रेल्वेच्या वक्‍तशीर सेवेशी नेहमी तुलना करता मध्य रेल्वे पिछाडीवर पडते. त्या मार्गावर "कल्याण' स्थानक नाही, ही वस्तुस्थिती रेल्वे अधिकारी सांगतात. दिवसभरात जवळपास 560 लोकल कल्याण स्थानकात ये-जा करतात. 160 मेल व एक्‍स्प्रेस कल्याणमार्गे येतात. 40 मालगाड्यांचा मार्ग हा कल्याणहून जातो. प्रत्येक फलाटावर दोन मिनिटांनी एक गाडी येते. त्या परिस्थितीत कल्याणच्या पलीकडे असलेल्या टिटवाळा किंवा बदलापूरसाठी नवीन लोकल सोडता येत नाही. जोपर्यंत कल्याण स्थानकाच्या नियोजनात बदल करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नाही, तोपर्यंत हा प्रश्‍न सुटणार नाही, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने बैठकीत स्पष्ट केले.

देखभालीचा कालावधी एक तास
मध्य रेल्वेच्या मार्गावरील वाहतूक लक्षात घेता फक्त एक तास हा दुरुस्तीसाठी राखीव ठेवला आहे. कर्जत स्थानकावर शेवटची व पहाटेच्या पहिल्या लोकलमध्ये केवळ 7 ते 8 मिनिटांचे अंतर आहे. त्या एक तासांमध्ये रेल्वेरूळ व ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती व देखभाल करण्यात येते. प्रतिदिन केवळ रविवारप्रमाणे 1325 लोकलच्या फेऱ्या चालवल्या, तरच चार तासांचा अवधी हा देखभालीसाठी मिळेल.

मध्य रेल्वे
लोकल सेवा फेऱ्या
सीएसटी ते खोपोली 231
सीएसटी ते कसारा 151
सीएसटी ते कल्याण 259
सीएसटी ते डोंबिवली 197
एकूण 838
कि.मी. (प्रतिदिन) 45668

हार्बर
सीएसटी- पनवेल 590
कि.मी ( प्रति दिन) 19947

ट्रान्स हार्बर
ठाणे- पनवेल 232
कि.मी ( प्रति दिन) 5310

गर्दी वाढलेली स्थानके
स्थानक प्रवाशी
पळसदरी 14604
आंबिवली 5214273
रबाळे 4416820
कल्याण 34195777
डोंबिवली 44170819
मुंब्रा 14922611
घणसोली 5772654
नेरूळ 12557229
कळवा 13096278
बदलापूर 16174376
वांगणी 1533512
डोलवली 32865
खोपोली 901700
भिवंडी रोड 1216152
नेरळ 2209064
तुर्भे 3301005
टिटवाळा 8104784
(एप्रिल ते सप्टेंबर 2016 पर्यंची ही आकडेवारी असून रेल्वेच्या पाहणीत या स्थानकांवरील संख्या वाढली आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com