"ओबीसी योद्धा' पुन्हा लढणार 

chhagan bhujbal
chhagan bhujbal

ठाणे - दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जामिनावर सुटल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना राज्यस्तरीय ओबीसी जनगणना महापरिषदेच्यावतीने "ओबीसी योद्धा पुरस्कार' देऊन सन्मान केला जाणार आहे. 

आझाद मैदानात होणाऱ्या "ओबीसी जातनिहाय जनगणना' अभियानाचा 11 मे रोजी समारोप होणार आहे. त्या वेळी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यानिमित्ताने छगन भुजबळ जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. या सोहळ्याला अनेक नेते सहभागी होणार आहेत. भुजबळांच्या सुटकेमुळे राज्यभर सुरू असलेल्या ओबीसी जनगणना अभियानाला बळ प्राप्त झाल्याची भावना आमदार हरीभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे. 

बुधवारी ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे उपनेते दशरथ पाटील, ओमप्रकाश मौर्या, डी. के. माळी, प्रा. श्रवण देवरे आदी उपस्थित होते. संविधानिक न्याय यात्रेअंतर्गत राज्यस्तरीय ओबीसी जातनिहाय जनगणना अभियान 11 एप्रिलला पुण्यातून सुरू झाले. 

देशातील भटक्‍या-विमुक्त जाती-जमाती, बलुतेदार, विश्वकर्मा, मुस्लीम अशा ओबीसी घटकातील जाती-जमातींची जातनिहाय जनगणना 2012च्या जनगणनेत करण्याची मुख्य मागणी या अभियानात करण्यात आली आहे. 

पश्‍मिच महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांतील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी जनगणना परिषद घेण्यात येत आहे. 11 मे रोजी हे जनगणना अभियान मुंबईत प्रवेश करणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता या अभियानाच्या समारोपाची जाहीर सभा आझाद मैदानावर घेतली जाईल. याच ठिकाणी छगन भुजबळ यांना "ओबीसी योद्धा' हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. या वेळी भुजबळ हे या माध्यमातून आपले जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सभेचे अध्यक्षपदच छगन भुजबळ यांच्याकडे असणार आहे, असा ठराव 22 एप्रिलला परभणीतील जनगणना अभियानाच्या बैठकीत एकमताने मंजूर झाला होता. त्यामुळे भुजबळ समर्थकांनी आधीपासूनच ही तयारी सुरू केल्याचे समजते. 

भुजबळांना जामीन मिळाला नसता तर अध्यक्षस्थान रिक्त ठेवले असते, असेही राठोड यांनी सांगितले. 

देशभरातील ओबीसी  नेते एकवटणार 
या परिषदेचा समारोप बाळासाहेब प्रकाश आंबेडकर करणार असून, उत्तर प्रदेशचे गोरखपूर मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले खासदार प्रवीणकुमार निषाद, हरियाणाचे ओबीसी खासदार राजकुमार सैनी, मुस्लीम ओबीसी नेते आमदार हुसेन दलवाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. देशभरातील ओबीसी मतदारांना एकसंध ठेवण्यासाठीचे आव्हान या परिषदेसमोर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com