काँग्रेससमोर बंडखोरांचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

नवीन पनवेल - आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षामध्ये जागावाटपावरून तिढा निर्माण झाल्याचे समजते. या पक्षातून उमेदवारी मिळाली नाही, अशा काही इच्छुकांनी इतर पक्षांची वाट धरली आहे. काहींनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

नवीन पनवेल - आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षामध्ये जागावाटपावरून तिढा निर्माण झाल्याचे समजते. या पक्षातून उमेदवारी मिळाली नाही, अशा काही इच्छुकांनी इतर पक्षांची वाट धरली आहे. काहींनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला नमवण्यासाठी शेकाप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र आले आहेत. आघाडीच्या उमेदवारीवाटपाच्या सूत्रानुसार काँग्रेसला १८ जागा दिल्या आहेत; परंतु पक्षातून दीडशेपेक्षा अधिक इच्छुक आहेत. त्यामुळे या पक्षात गट तयार झाल्याचे समजते. जागावाटपाच्या निर्णयावरून सोमवारी (ता. १) पनवेल काँग्रेस कार्यालयात दोन गटांमध्ये वादसुद्धा झाले. त्यामुळे मंगळवारी (ता.२) टिळक भवन येथे पनवेल काँग्रेस कार्यकर्त्यांची तातडीची बैठक  झाली; परंतु त्यामधून सर्वमान्य तोडगा निघाला नाही. त्यामुळे पक्षात दोन गट पडल्याचे सांगण्यात येते. या वादानंतर काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मुकीत काझी यांनी बुधवारी (ता.३) रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. काझी ३० वर्षांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते होते. ते काँग्रेसच्या महाराष्ट्र अल्पसंख्याक कमिटीचे सचिव होते. निवडणुकीसाठी त्यांनी आघाडीमधून उमेदवारीची मागणी केली होती; पण निष्ठावंत कार्यकर्ता असूनसुद्धा त्यांना डावलून लतीफ शेख यांना उमेदवारी देण्याचे ठरवल्याने दुखावलेल्या काझी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

काँग्रेसचे पनवेलमधील नेते मुस्लिम समाजाचा वापर करून घेतात. लतीफ शेख यांना उमेदवारी देऊन माझ्यासारख्या निष्ठावंतावर पक्षाने अन्याय केला आहे.
- मुकीत काझी