जुन्या नोटा बदलण्यासाठी 'आरबीआय'समोर गर्दी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 मार्च 2017

अनिवासी भारतीयांसाठी उद्या अंतिम मुदत
मुंबई - पाचशे-हजारच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने बुधवारी (ता. 29) नागरिकांनी रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) मुंबईतील मुख्यालयाबाहेर गर्दी केली होती. गुजरात आणि इतर राज्यांतूनही आलेले नागरिक भरउन्हात चारपाच तास ताटकळत होते.

अनिवासी भारतीयांसाठी उद्या अंतिम मुदत
मुंबई - पाचशे-हजारच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने बुधवारी (ता. 29) नागरिकांनी रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) मुंबईतील मुख्यालयाबाहेर गर्दी केली होती. गुजरात आणि इतर राज्यांतूनही आलेले नागरिक भरउन्हात चारपाच तास ताटकळत होते.

नोटाबंदीच्या काळात परदेशी गेलेल्या भारतीयांना आवश्‍यक कागदपत्रांसह रिझर्व्ह बॅंकेत 31 मार्चपर्यंत जुन्या नोटा जमा करता येणार आहेत; मात्र याबाबत सोशल मीडियावर चुकीचा मेसेज व्हायरल झाल्यावर सर्वसामान्यांनीही आरबीआयच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली. बुधवारी नागरिकांची मोठी रांग लागली होती. नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अहमदाबाद, सूरत येथूनही नागरिक जुन्या नोटा जमा करण्यासाठी आले होते. नाशिकवरून आलेल्या जितेन चंदानी यांना अडीच हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी तब्बल पाच तास रांगेत ताटकळत राहावे लागले. रत्नागिरीहून आलेल्या समीर खेर यांनीही हीच खंत व्यक्त केली. त्यांना पाच हजारांच्या जुन्या नोटा बदलण्याकरता सहा तास प्रतीक्षा करावी लागली.

भारतीय पारपत्र असलेल्या अनिवासी भारतीयांना 30 जूनपर्यंत जुन्या नोटा बदलण्याची संधी आहे; मात्र नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन आरबीआयने केले आहे.

मुदतवाढीची शक्‍यता धूसर
अनिवासी भारतीय वगळता इतरांना जुन्या नोटा बदलण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत होती. अनिवासी भारतीयांसाठी 31 मार्चपर्यंत मुदत आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी याचिका करण्यात आली; मात्र यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे सरकारकडूनही मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता धूसर झाल्याचे आरबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

...तर दंड भरावा लागणार
संसदेने गेल्या महिन्यात निर्दिष्ट बॅंक नोट कायदा मंजूर केला. रद्द केलेल्या जुन्या नोटांच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था चालवली जाऊ नये, यासाठी हा कायदा आहे. पाचशे किंवा हजारच्या 10 हून अधिक नोटा सापडल्यास संबंधिताला 50 हजारांचा दंड भरावा लागणार आहे.

Web Title: to change the old currency crowd rbi bank