आकाशातून मृत्यूचा घाला

आकाशातून मृत्यूचा घाला

मुंबई - घाटकोपर पश्‍चिममधील जीवदया लेन परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीलगतच्या परिसरात गुरुवारी चार्टर्ड विमान कोसळून दोन वैमानिकांसह पाच जणांचा मृत्यू, तर तिघे जखमी झाले. स्वत-चा मृत्यू समोर दिसत असतानाही प्रसंगावधान दाखवून वैमानिकाने मोकळा परिसर पाहून विमान पाडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विमान कोसळल्यानंतर चार स्फोट होऊन प्रचंड आग लागली. त्यामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले होते. 

मूळ उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचे असलेले हे विमान "यूवाय एव्हिएशन' कंपनीने विकत घेतले होते. चाचणीसाठी व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 या विमानाने दुपारी 12.30 नंतर जुहू येथून उड्डाण केले. मात्र दुपारी एक वाजून 13 मिनिटांनी ते कोसळले. त्यात वैमानिक मारिया झुबेरी आणि प्रदीप राजपूत, अभियंता सुरभी गुप्ता, तंत्रज्ञ मनीष पांडे यांच्यासह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत मृत पादचाऱ्याची ओळख पटली नव्हती. लवकुश कुमार (वय 21), नरेश कुमार निसाद (24) आणि प्रशांत महांकाळ (23) दुर्घटनेत किरकोळ जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि रुग्णवाहिका, "एनडीआरएफ'चे पथक आणि विमान अपघात तपास विभागाचे (एएआयबी) अधिकारी घटनास्थळी पोचले. "एनडीआरएफ' आणि अग्निशमन दलाने मदत कार्य केले. त्यात विमानाचे अवशेष बाजूला हटविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, विमान कोसळण्यापूर्वी त्या परिसरात विमानाने एक फेरी मारली होती. त्यानंतर ते बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या कंपाउंडमध्ये कोसळले. दुर्घटनेपासून काही अंतरावरच रहिवाशांची मोठी वस्ती आहे. तेथे अरुणा मनहरलाल शाह मॅनेजमेंट महाविद्यालयही आहे. अशा स्थितीत वैमानिक महिलेने प्रसंगावधान राखून मोकळ्या परिसरात विमान पाडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मुंबईत अशा प्रकारे विमानाचा अपघात होण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. दीड वर्षापूर्वी पर्यटनासाठी जुहू येथील विमानतळावरून निघालेले हेलिकॉप्टर आरेनजीकच्या जंगलात कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. 

चौकशीचे आदेश 
विमान दुर्घटनेप्रकरणी नागरी उड्डाण महासंचालक (डीजीसीए) विभागाने प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच विमान अपघात तपास विभाग (एएआयबी) याप्रकरणी तपास करून त्याचा अहवाल तयार करणार आहे. 

घटनाक्रम... 
- सकाळी 11 - विमान उड्डाण करणार होते; मात्र काही कारणास्तव ते लांबले. 
- दुपारी 12 - चाचणीकरिता श्रीफळ फोडल्यानंतर विमानाचे उड्डाण. 
- 1.13 - विमान कोसळले. 
- 1.13 - दुर्घटनाग्रस्त विमानात चार स्फोट. 
- 1.16 - अग्निशमन दलाला पाचारण. 
- 1.20 - आगीत पादचाऱ्याचा होरपळून कोळसा. 
- 1.37 - अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. 
- 1.40 - विमानाला लागलेली आग आटोक्‍यात. 
- 1.45 - विमानातून चौघांना बाहेर काढले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com