उद्योजिकेला कोट्यवधींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई - पतीचे त्याच्याच कंपनीतील मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करणाऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत, असे सांगून उद्योजिकेची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या खासगी गुप्तहेराला गुन्हे शाखेने बुधवारी (ता. 29) अटक केली. तुमच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा पडणार आहे, अशी भूलथाप मारून संशयिताने आपले तीन कोटींचे हिरे व सोन्याचे दागिने घेतले व ते परत केले नाहीत, असाही आरोप उद्योजिकेने केला आहे.

राजेश तुळशीदास नाखुआ (वय 43) असे संशयिताचे नाव आहे. यापूर्वी 2014 मध्ये अग्निशस्त्र दाखवून धमकावल्याप्रकरणी पार्कसाईट पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नववीपर्यंत शिक्षण घेतलेला राजेश खासगी गुप्तहेर कंपनी चालवतो. तक्रारदार महिलेला दागिने परत केल्याचे दाखवण्यासाठी त्याने बनावट पावती बनवली होती. त्यावर तिची बनावट स्वाक्षरीही केली होती. हस्ताक्षरतज्ज्ञांचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याचा तपास नंतर गुन्हे शाखा कक्ष सहाकडे देण्यात आला होता.

पतीचे त्याच्याच कंपनीतील सीईओ महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे सांगून त्याबाबत पुरावे गोळा करण्याची भूलथाप देत राजेशने आधी चार लाख रुपये घेतले. त्यानंतर पती सर्व दागिने सीईओ महिलेला देणार आहे आणि तुमच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा पडणार आहे, असे खोटे सांगून आपले दागिनेही घेतल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. मुलीच्या अपहरणाची धमकीही त्याने दिली होती. पवईतील बॅंक लॉकरमधून तक्रारदार महिलेने राजेशला तीन कोटींचे दागिने दिले. ते राजेशने तिच्या ओळखीतील महिलेच्या बॅंक लॉकरमध्ये ठेवल्याचे तपासात स्पष्ट झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: cheating in mumbai