सफाई कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

शहरातील कचरा उचलण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत 70 टक्के कचरा उचलण्यात आला. उर्वरित कचरा रात्रभरात उचलण्यात येईल; तर उद्या सकाळपासून कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरळीत होईल. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही. -अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त.

नवी मुंबई - किमान वेतनासाठी चार दिवसांपासून सुरू असलेला सफाई कामगारांचा संप महापालिका अधिकारी व समाज समता कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर आज पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आला. महापालिकेने किमान वेतनाबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची लेखी हमी दिल्यानंतर कामगारांनी संपातून माघार घेतली. मात्र, दोन महिन्यांत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, दोन दिवसांत शहरातून दोन हजार टन कचरा उचलण्यात आला असल्याचा दावा पालिकेने केला असला तरी शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत होते.

महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना "समान काम व समान वेतन' धोरणानुसार वेतन मिळत नसल्याने महापालिकेने कंत्राटदारांच्या माध्यमातून किमान वेतन द्यावे, अशी जोरदार मागणी समाज समता कामगार संघाने महापालिकेकडे केली होती. मात्र, त्या मागणीवर महापालिकेकडून दिरंगाई झाल्याने अखेर समाज समता कामगार संघाने बेमुदत संपावर जाण्यासाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे सलग पाच दिवसांपासून शहरातील कचरा उचलण्यात आला नव्हता. त्यामुळे ऐरोली ते बेलापूरपर्यंत रस्ते, पदपथ व गल्ल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग झाले होते. महापालिकेने काही अंशी कचरा उचलण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला संप करणाऱ्या कामगारांकडून अडथळे आणण्यात आले. त्यामुळे महापालिकेने पोलिस बंदोबस्तात कालपासून कचरा उचलण्यास सुरुवात केली होती. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांबरोबर चर्चाही सुरू केली होती.

महापालिका अधिकारी व समाज समता कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेवेळी महापालिकेने किमान वेतन देण्यासाठी दोन महिन्यांची लेखी हमी दिली. त्यानंतर कामगारांनी संप स्थगित करून, कचरा उचलण्यास सुरुवात झाली. दोन दिवसांत महापालिकेने 10 ट्रक व 10 जेसीबीच्या साह्याने शहरातून सुमारे दोन हजार टन कचरा उचलला. मात्र, अद्याप कचऱ्याचे ढीग कायम असल्यामुळे व दिवाळीमुळे वेगाने कचरा उचलणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

सफाई कामगारांच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यामुळे आम्ही संप तात्पुरता स्थगित करीत आहोत. मात्र, मुदतीत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

- मंगेश लाड, सरचिटणीस, समाज समता कामगार संघ.

Web Title: Cleaning employee strike cancelled