स्वच्छतेबाबत मुंबईकर सजग

Cleaning-Mumbai
Cleaning-Mumbai

मुंबई - केंद्र सरकारतर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेत मुंबई महापालिकेला देशातील सर्वांत स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मिळाला आहे. त्यामुळे मुंबईकर स्वच्छतेबाबत सजग असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका प्रशासन राबवत असलेल्या स्वच्छ मुंबई अभियानास नागरिकांच्या मिळालेल्या मोलाच्या सहकार्यामुळे मुंबईच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत देशभरात ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ राबवण्यात आले होते. त्यात मुंबईने अव्वल स्थान पटकावले. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका अनेक महिन्यांपासून शहरात जनजागृती करत आहे. सोसायट्यांना कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. तसे न करणाऱ्या सोसायट्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात येत आहे. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे, हे ओळखून नागरिकांनीही या मोहिमेस चांगले सहकार्य केले. त्याची परिणती शहराला हा मान मिळण्यात झाली.

सफाई कामगारांचेही योगदान
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रोज सुमारे नऊ हजार टन कचरा निर्माण होतो. त्याची विल्हेवाट लावण्याचे काम मुंबई महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन खाते करते. मुंबईला सर्वांत स्वच्छ राजधानीचा मान मिळवून देण्यात या विभागात काम करणाऱ्या २१ हजार सफाई कामगारांचेही मोठे योगदान आहे. हे कामगार ऊन-पावसाची तमा न बाळगता घरगल्ल्यांपासून रस्ते, चौपाट्यांची सफाई करत असतात. वर्षाचे ३६५ दिवस हे कामगार काम करत असतात. त्यामुळेच शहर स्वच्छ राहण्यात मदत होते.

असे झाले शहर स्वच्छ
 कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेतर्फे जनजागृती
 सुका-ओल्या कचऱ्याच्या वर्गीकरणाचा प्रयोग
 मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणांची वेळोवेळी स्वच्छता
 घरगल्ल्यांची वेळोवेळी सफाई
 हागणदारीमुक्त मुंबईसाठी प्रयत्न
 कचरा व्यवस्थापनाचे भविष्यातील नियोजन 

या निकषांवर मिळाला मान 
 शहराची स्वच्छता
 कचऱ्याच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यांचे पालिकेतर्फे झालेले निवारण
 हागणदारीमुक्त शहरासाठी केलेले प्रयत्न
 कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केलेल्या उपायोजना 
 कचऱ्याचे वर्गीकरण
 कचरा व्यवस्थापनाच्या भविष्यकालीन योजना
 शहर स्वच्छता आराखडा आणि सविस्तर अहवाल

शहरातील नागरिक, सफाई कर्मचारी आणि पालिका अधिकाऱ्यांचा हा सन्मान आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 
- विश्‍वनाथ महाडेश्‍वर, महापौर 

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक, पालिकेचे सफाई कामगारांच्या सहकार्य मिळाले. त्याची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्यात आल्याने मोठे समाधान वाटते.  
- अजोय मेहता, पालिका आयुक्त

मुंबईला स्वच्छ राजधानीचा दर्जा मिळाला ही अभिमानाची बाब आहे; मात्र एवढ्यावरच समाधान मानता कामा नये. प्रत्येकाने  शहर स्वच्छ ठेवण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.
- अनिता माने, माटुंगा

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला हा मान मिळाल्याबद्दल आनंद आहे; पण शहराच्या स्वच्छतेसाठी पालिका आणि नागरिकांकडून आणखी प्रयत्न व्हायला हवेत. 
- सुनीता कांबळे, दादर

कचऱ्याचे वर्गीकरण अजूनही म्हणावे तसे होत नाही. सोसायट्यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावर भर द्यावा.  नाले तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. 
- सुनील देवघरकर, काळाचौकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com