मुंब्रा बायपास मार्ग बंद

mumbra bypass
mumbra bypass

ठाणे - प्रशासकीय मानापमान नाट्यामुळे रखडलेल्या मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचे काम उद्या (ता. ७) मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. या दुरुस्ती कामामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई शहरांसह शहापूर व मुरबाड, कर्जतच्या ग्रामीण भागातून होणाऱ्या वाहतुकीला फटका बसणार आहे. पुढील दीड महिना हे काम सुरू राहणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि वाहतूक शाखेने अधिसूचना जारी केली आहे; मात्र पर्यायी मार्गाबाबत वाहनचालकांना माहिती नसल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.

मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे जड व अवजड वाहने ठाणे शहरातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील कापूरबावडी, मुलुंड टोलनाका, ऐरोली आणि बेलापूर रस्त्याने वळवली जाणार आहे. रात्री ११ नंतर वाहने कल्याण शहरातून शिळ फाट्याकडे रवाना होणार असल्यामुळे मोठी कोंडी होणार आहे. या बदलामुळे मध्यरात्री उशिरा आणि पहाटे कोंडी होण्याची शक्‍यता आहे. मुंब्रा बायपासच्या चार किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम २४ एप्रिलपासून सुरू होणार होते; मात्र ठाणे ग्रामीण पोलिस, ठाणे आणि पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वेळेत अधिसूचना न काढल्याने ते लांबणीवर पडले. वाहतूक विभागाने सुचवलेल्या मुरबाड, शहापूर, किन्हवली पर्यायी मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे दुरुस्तीचे कारण देऊन अध्यादेश काढण्यात आला नव्हता. आता पर्यायी मार्ग पूर्णपणे दुरुस्त करण्यात आल्याचा दावा सार्वजनिक विभागातर्फे करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाला हिरवा कंदीलही दिला आहे.

हे आहेत   पर्यायी मार्ग
नाशिक जिल्ह्याहून होणारी वाहतूक शहापूर-शेणवा-किन्हवली-सरळगाव-मुरबाड-कर्जत-चौक फाटामार्गे जेएनपीटीकडे. (एकेरी वाहतुकीसाठी)
रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत मनोरहून टेण नाका-वाघोडे टोल प्लाझा, वाडा-कवाड टोल नाका, नदी नाका ब्रिजवरून डावीकडे वळण घेऊन चाविंद्रा, वडपा-मुंबई-नाशिक महामार्गाने येवई नाक्‍यावर डावीकडे वळण घेऊन पाईपलाईनमार्गे गांधारी ब्रिजवरून आधारवाडी सर्कल (कल्याण)च्या दिशेने.
 घोडबंदर रोडवरील वरसावे नाक्‍यावरून जेएनपीटी, नवी मुंबई आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना घोडबंदर रोड-कोपरी ब्रिज-मुलुंड चेक नाका- ऐरोली मार्गे.

अवजड वाहनांना टोकन 
मुंब्रा बायपासवरून रोज १५०० अवजड कंटेनरची वाहतूक होते. दुरुस्तीच्या कामामुळे जेएनपीटीतून टप्प्याटप्प्याने वाहने सोडण्यासाठी टोकन दिले जाणार आहे. ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहतुकीवर अवजड वाहनांमुळे परिणाम टाळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीचा मार्ग, वाहतूक करण्याची वेळ आणि माहितीपत्रक देण्यात येणार आहे. टोकननुसार वाहतूक न केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com