CM'पेक्षा विरोधी पक्षनेत्यांना मोठा प्रतिसाद

तुषार खरात
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुख्यमंत्र्यांचे फेसबुकवर तब्बल 20 लाख फालोअर्स आहेत, तर धनंजय मुंडे यांचे अवघे 1 लाख 81 हजार फालोअर्स आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांचे भाषण त्यांच्या फालोअर्सना रुचलेले दिसत नाही.

मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेतील निवेदन, तसेच विधानपरिषदेतील धनंजय मुंडे यांचे भाषण फेसबुकवर लाईव्ह झाले होते. परंतु मुख्यमंत्र्यांपेक्षा मुंडे यांचेच भाषण नेटिझन्सनी डोक्‍यावर घेतल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या लाईव्ह निवेदनाला 28 तास उलटले आहेत, तर मुंडे यांच्या भाषणाला अवघे सात तास झाले आहेत. तरीही मुंडे यांना अधिक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर 28 तासानंतर 3100 लाईक्‍स, 362 कमेंटस्‌, 724 शेअर आणि 53000 क्लिक्स असा प्रतिसाद मिळाला आहे. तर धनंजय मुंडे यांच्या भाषणावर 7 तासानंतर 5500 लाईक्‍स, 1400 कमेंटस्‌, 552 शेअर झाले आहेत. तब्बल 40,000 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांचे फेसबुकवर तब्बल 20 लाख फालोअर्स आहेत, तर धनंजय मुंडे यांचे अवघे 1 लाख 81 हजार फालोअर्स आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांचे भाषण त्यांच्या फालोअर्सना रुचलेले दिसत नाही, याउलट मुंडे यांचे भाषण मात्र त्यांच्या फालोअर्सना आवडलेले दिसून येत आहे.