ट्युशनच्या ठिकाणी दिली कॉलेजची परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मुंबई - बोरिवलीतील महाविद्यालयात विज्ञान शाखेत पहिल्या वर्षात शिकणाऱ्या 76 विद्यार्थ्यांनी खासगी शिकवणीच्या जागेत लेखी परीक्षा दिल्याची धक्कादायक माहिती आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात परीक्षा देणे आवश्‍यक होते; मात्र त्यांनी खासगी शिकवणीच्या ठिकाणी परीक्षा दिल्याचे कळल्यावर खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी प्राध्यापक आणि शिकवणीचालकाला पोलिसांनी अटक केली. प्रशांत अरविंद गायकवाड आणि मकरंद गोडस अशी दोघांची नावे आहेत. त्या दोघांना शुक्रवारपर्यंत (ता. 26) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बोरिवली पश्‍चिम येथे खासगी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात 76 विद्यार्थी शिकत आहेत. ते चारकोप येथील मकरंद गोडस क्‍लासेसमध्ये शिकण्याकरता जात होते. गोडसने विद्यार्थ्यांकडून मोठे पॅकेज घेतले होते. त्यानुसार सरावाची परीक्षा फक्त महाविद्यालयात आणि इतर परीक्षा ट्युशनच्या ठिकाणी घेतल्या जाणार होत्या. गायकवाड याने काही महिन्यांपूर्वी चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. फेब्रुवारीत 76 विद्यार्थ्यांची परीक्षा खासगी ट्युशनच्या ठिकाणी झाली. हे माहीत असतानाही गायकवाड याने पोलिसांकडे का तक्रार केली नाही, याबाबत पोलिसांनी त्याची चौकशी केली. पोलिसांनी पालकांकडे चौकशी केल्यानंतर लगेच गायकवाड आणि गोडस याला अटक केली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरपत्रिका मात्र जप्त केलेल्या नाहीत.